Join us

कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, मलिक यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:54 IST

शासनाने डेडिकेटेड कोविड सेंटर उभे केले होते त्याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या, तेथे रुग्णांना बेड मिळालेत. सरकारी रुग्णालयात एकही बेड नव्हता, म्हणून रुग्ण दगावले नाहीत.

ठळक मुद्देकोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं असून सरकारच्या हलगर्जीपणामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या दोन महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सामना रंगला होता. समीर वानखेडे हे भ्रष्ट आणि खंडणीखोर अधिकारी असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यामुळे, मलिक यांच्या आरोपांचीच राज्यभर चर्चा होती. आता मलिक यांनी राज्य सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाचं कौतुक केलंय. तसेच, कोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं असून सरकारच्या हलगर्जीपणामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे. 

शासनाने डेडिकेटेड कोविड सेंटर उभे केले होते त्याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या, तेथे रुग्णांना बेड मिळालेत. सरकारी रुग्णालयात एकही बेड नव्हता, म्हणून रुग्ण दगावले नाहीत. सरकारी रुग्णालयातही बेड आणि ऑक्सिजनची पूर्तता होत होती. केवळ, रुग्णांच्या नातेवाईकांच्या सिलेक्टीव्ह मागणीच्या ठिकाणीच या अडचणी जाणवल्या आहेत. म्हणजे, एखाद्याला रुबी रुग्णालयातच उपचार हवे होते, पण तेथे ते मिळाले नाहीत, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी कोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केल्याचं प्रमाणपत्रच दिलंय. 

कोविड काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे किंवा ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही. नाशिक, पालघर यांठिकाणी काही दुर्घटना घडल्या, त्या दुर्घटनेत रुग्णांचा जीव गेला. या दुर्घटनेतून रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे मलिक यांनी सांगितलं. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन, कोरोना कालावधी, परमबीर सिंग, सचिन वाझे, भाजपाचं राजकारण यासह विविध विषयांवर भाष्य केलं. 

अब्रुनुकसानीचे आरोप अजिबात मान्य नाहीत

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी माझ्यावर करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा आरोप अमान्य असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणात मलिकांनी माझगाव न्यायालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, ते सर्व पुरावे आम्ही न्यायालयाला सादर करू. आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. मलिक यांनी दरेकरांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांना थेट आव्हानच दिलं आहे. 'आ देखें ज़रा किसमें कितना है दम' अशा कॅप्शनसह मलिकांनी दरेकरांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी ट्विटमध्ये प्रवीण दरेकरांनाही टॅग केलं आहे.

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसकोरोना वायरस बातम्या