विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आठ निविदा; कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:56 AM2024-03-27T10:56:01+5:302024-03-27T10:58:19+5:30

मुंबई महानगरातील पहिल्या प्रवेश नियंत्रित अशा विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत.

there are eight tender for virar alibaug route the way for appointment of contractor will be clear in mumbai | विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आठ निविदा; कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार

विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आठ निविदा; कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार

मुंबई :मुंबई महानगरातील पहिल्या प्रवेश नियंत्रित अशा विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी आठ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या मार्गिकेच्या कामासाठी निविदा अंतिम केल्या जाणार असून पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशीय वाहतूक मार्ग उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगरातील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. या मार्गामधोमध १३६ कि.मी. लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर ते पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान ९६ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाईल. या महामार्गासाठी यासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भूसंपादनाच्या सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.

वैशिष्ट्ये-

१) एकूण आठ लेनचा रस्ता (प्रत्येकी चार लेन) 

२) रस्त्याच्या मध्यभागी मेट्रो मार्गिका प्रस्तावित.

३) जेएनपीटी बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमटीएचएल जोडणार. 

४) मुंबई-दिल्ली कॉरिडॉर आणि विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिका हे काही भागांत एकत्रित जाणार.

९६ कि.मी. लांबीच्या मार्गाचे काम-

१) दरम्यान, या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील ९६ कि.मी. लांबीच्या मार्गाचे काम ११ पॅकेजमध्ये केले जाणार आहे. 

२) या अकरा पॅकेजच्या उभारणीसाठी १९ हजार ३३४ कोटी रुपयांच्या निविदा एमएसआरडीसीने काढल्या आहेत. एमएसआरडीसीने जानेवारीमध्ये या निविदा मागविला होत्या. आता त्या निविदांना आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. 

३) त्यामध्ये निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीसह, एल अँड टी, अप्को, अफकॉन, पटेल इन्फ्रा, वेलस्पून इंटरप्रायजेस, मोन्टोकार्लो या कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या प्रकल्पाच्या आर्थिक निविदा एप्रिल महिन्यात खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

Web Title: there are eight tender for virar alibaug route the way for appointment of contractor will be clear in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.