राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:46 IST2025-11-27T06:46:07+5:302025-11-27T06:46:56+5:30
‘शक्ती’चा मृत्यू न्यूमोनियाची बाधा होऊन श्वसन प्रणाली बंद झाल्याचे उद्यानाकडून सांगण्यात येत आहे.

राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
मुंबई - मुंबईच्या राणी बागेतील रॉयल बंगाल शक्ती (नर) वाघाचा १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मृत्यूची प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप होत आहे. १२ फेब्रुवारी २०२० रोजी सिद्धार्थ गार्डन अँड झू, छत्रपती संभाजीनगर येथून ‘करिश्मा’ आणि शक्ती ही वाघांची जोडी भायखळा प्राणिसंग्रहालयात आणण्यात आली.
‘शक्ती’चा मृत्यू न्यूमोनियाची बाधा होऊन श्वसन प्रणाली बंद झाल्याचे उद्यानाकडून सांगण्यात येत आहे. या वाघाने १५ नोव्हेंबर रोजी काहीही अन्न खाल्ले नव्हते. दुसऱ्या दिवशी शक्तीने थोडे जेवण घेतले होते. आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना अचानक अपस्माराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
प्राणिप्रेमींकडून संशय
शक्तीच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले तरी उपचार करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप प्राणिप्रेमी प्रथमेश जगताप यांनी केला. व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर त्याची माहिती वनविभाग जाहीर करतात. मग शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न करण्यामागचे नेमके कारण काय, ते पुढे आले पाहिजे, तसेच प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.