.. तर मुंबईच्या विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

By जयंत होवाळ | Published: June 21, 2024 08:44 PM2024-06-21T20:44:41+5:302024-06-21T20:44:51+5:30

मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरीन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक योगदिनाचे औचित्य साधत करण्यात आले.

then the speed of development and beauty of Mumbai will surely increase; said Chief Minister Eknath Shinde | .. तर मुंबईच्या विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

.. तर मुंबईच्या विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

मुंबई:  मुंबई आपली आहे, तिच्यासाठी काही तरी करायला हवे, या भावनेने आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनसारख्या आणखी काही संघटना जेव्हा एकत्र येतील तेव्हा मुंबईच्या  विकासाचा आणि सुंदरतेचा वेग नक्की वाढेल , असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मरीन ड्राईव्ह परिसरात शामलदास गांधी मार्गावरील (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक योगदिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उड्डाणपुलाखाली साकारण्यात आलेल्या शिल्पांच्या माध्यमातूनही योगाचे महत्त्व विशद करण्यात आल्याचे ते म्हणाले.

मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सरकार आणि पालिका अथक परिश्रम घेत आहे. यासोबतच विविध संस्था, संघटना आणि सर्वसामान्य मुंबईकरांनीही या मोहिमेत सहभागी व्हायला हवे. त्यासाठी सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहाण, सहायक आयुक्त जयदीप मोरे, आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनच्या शायना एन. सी. आणि अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ उपस्थिती होते.  यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की , संपूर्ण मुंबईतील रस्ते सिंमेट काँक्रिटचे करण्यात येत आहेत. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत असतील. वाहतूक कोंडीमुक्त मुंबईसाठी सरकार , मुंबई पोलिस यांच्यासमवेत मिळून पालिका एकत्रितपणे काम करीत आहे. मुंबईतील समुद्र चौपाट्यांवरही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या शायना एन. सी. यांच्या नेतृत्वाखाली शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपुलाखाली विविध योगमुद्रा कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. बाया डिझाईनच्या शिबानी दास गुप्ता यांनी ही शिल्पे  साकारली आहेत.

Web Title: then the speed of development and beauty of Mumbai will surely increase; said Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.