...तर कंत्राटदारांना धूळदंड; हवा प्रदूषित कराल तर २० लाखांपर्यंत दंड, एमएमआरडीए आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:29 IST2024-12-29T13:28:56+5:302024-12-29T13:29:07+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील धुळीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच प्रदूषणामुळे शहरातील दृश्यमानताही घटली आहे.

then fines for contractors; fines of up to 20 lakhs if they pollute the air, MMRDA aggressive | ...तर कंत्राटदारांना धूळदंड; हवा प्रदूषित कराल तर २० लाखांपर्यंत दंड, एमएमआरडीए आक्रमक 

...तर कंत्राटदारांना धूळदंड; हवा प्रदूषित कराल तर २० लाखांपर्यंत दंड, एमएमआरडीए आक्रमक 

मुंबई : मुंबईतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी एमएमआरडीएने कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कंत्राटदारांनी बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास त्यांच्यावर २० लाखांपर्यंत दंड आणि काम थांबविण्याची कारवाई केली जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील धुळीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच प्रदूषणामुळे शहरातील दृश्यमानताही घटली आहे. सध्या इमारती आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, डेब्रीजचे व्यवस्थापन आणि प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यानुसार, कंत्राटदारांना नियम पाळणे बंधनकारक केले आहे. या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ लाख रुपये दंड आकारण्यात येईल, तर पुन्हा उल्लंघन झाल्यास हा दंड २० लाखांपर्यंत वाढवला जाईल. तसेच प्रकल्पाचे कामकाज थांबवण्याची कारवाई केली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्वच्छ हवेसाठी प्रयत्नशील असणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे एमएमआरडीएने वेगवान पायाभूत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. 

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे ही सर्वांसाठीच प्राधान्याची बाब आहे. बांधकामामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एमएमआरडीएच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतील. विकास प्रकल्प राबविताना पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. स्वच्छ आणि अधिक शाश्वत एमएमआर निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
    - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री 
    आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष

असा आहे हवामानाचा दर्जा 
फाेर्ट    १५६    वाईट
वरळी    १५१    वाईट
नरिमन पाॅइंट    १५६    वाईट
प्रभादेवी    १६१    अत्यंत वाईट

उपाययोजना कोणत्या? 
-  धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बांधकामस्थळी वॉटर स्प्रिंकलर्स आणि फॉगिंग मशीन तैनात करणे
-  मातीची वाहतूक करताना आणि बांधकाम साहित्याच्या साठ्यावर पाण्याची नियमितपणे फवारणी 
-  प्रकल्प परिसरात यांत्रिक शक्तीवर चालणाऱ्या सफाई यंत्रांचा वापर
-  धूळ कमी करण्यासाठी बांधकाम आणि पाडकाम वाहतुकीचे नियोजन 
-  बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर झाकण आणि परवान्यांचे काटेकोर पालन
 

Web Title: then fines for contractors; fines of up to 20 lakhs if they pollute the air, MMRDA aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई