त्यांची व्होट बँक महत्त्वाची, तुम्ही दूषित पाणी प्या...

By अतुल कुलकर्णी | Updated: August 25, 2025 11:46 IST2025-08-25T11:46:06+5:302025-08-25T11:46:22+5:30

Mumbai News: पहिल्यांदा जेव्हा टोरेंटो शहरात गेलो, तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. रूममध्ये कुठेही पाण्याची बाटली दिसली नाही. रिसेप्शनवर फोन करून रूममध्ये पाण्याची बाटली नाही, असे सांगितले, तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, बाथरूममध्ये नळ आहे. त्याचे पाणी पिऊ शकता. बाथरूममधल्या नळाचे पाणी कसे प्यायचे? हा विचार करत असताना हॉटेलचा रिसेप्शनिस्ट म्हणाला...

Their vote bank is important, you drink contaminated water... | त्यांची व्होट बँक महत्त्वाची, तुम्ही दूषित पाणी प्या...

त्यांची व्होट बँक महत्त्वाची, तुम्ही दूषित पाणी प्या...

- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)

पहिल्यांदा जेव्हा टोरेंटो शहरात गेलो, तेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. रूममध्ये कुठेही पाण्याची बाटली दिसली नाही. रिसेप्शनवर फोन करून रूममध्ये पाण्याची बाटली नाही, असे सांगितले, तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, बाथरूममध्ये नळ आहे. त्याचे पाणी पिऊ शकता. बाथरूममधल्या नळाचे पाणी कसे प्यायचे? हा विचार करत असताना हॉटेलचा रिसेप्शनिस्ट म्हणाला, तुम्ही विकतचे पाणी घेतले आणि त्यातून तुम्हाला काही झाले, तर ती जबाबदारी आमची नाही. मात्र, बाथरूममधल्या नळाचे पाणी तुम्ही पायल्यानंतर काही झाले, तर ती आमची जबाबदारी असेल. केवढा हा कॉन्फिडन्स! ही गोष्ट नऊ-दहा वर्षांपूर्वीची आहे. हे चित्र केवळ कॅनडात नाही, ऑस्ट्रेलिया, जर्मनी कुठेही जा. तिथे पाणी विकत घ्यायला जाल, तर प्रचंड महाग पडते. मात्र, तुम्ही कुठेही बिनधास्त नळाचे पाणी पिऊ शकता. आपल्याकडे?

मुंबई महापालिकेचा पर्यावरण स्थिती अहवाल २०२४-२५ नुकताच आला आहे. त्यानुसार, मुंबईतील असुरक्षित पाण्याच्या नमुन्यांचे सरासरी प्रमाण ६.४६% राहिले आहे. गेल्या वर्षीदेखील हे प्रमाण एवढेच होते. म्हणजे त्यात फार फरक पडलेला नाही. मुंबईत एकूण २४ वॉर्ड आहेत. त्यातील सहा वॉर्डांमध्ये दूषित पाणी आढळले नाही. मात्र, १८  वॉर्डमध्ये दूषित पाणी आढळले. त्यातही पाच वॉर्डांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी आढळले. भेंडी बाजार, मस्जिद बंदर सोबतच वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी, कफ परेड, कुलाबा या भागांतही मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी आढळले आहे. याचा अर्थ जवळपास ६० ते ७० टक्के मुंबईकरांना कमी-जास्त प्रमाणात दूषित पाणी मिळत आहे.

आपल्याकडे बाटलीबंद पाणी विकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते, तिथून ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास बघितला तर हे पाणी शुद्ध आहे, असे कसे म्हणायचे, हा प्रश्न निर्माण होईल. काही मोजक्या कंपन्या सोडल्या, तर प्लास्टिकच्या बाटल्यांत कुठे, कसे पाणी भरले जाते कळत नाही. त्या बाटल्या ट्रकमध्ये भरून उन्हात ठिकठिकाणी पाठवल्या जातात. त्या थंड राहाव्या, म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. कोणाला साधे पाणी लागले, तर त्याच बाटल्या बाहेर काढून ठेवल्या जातात. बाहेरही ऊन-पाऊस यांचा मारा सोसत त्या पडून असतात. या कालावधीत प्लास्टिक कधी तापते, कधी थंड होते. त्याचा आतल्या पाण्यावर काय परिणाम होतो, याचा विचारही कोणी करत नाही. आपण फक्त बंद बाटलीतले पाणी प्यायल्याचे समाधान मानतो.

परदेशात जो विश्वास त्यांना नळाच्या पाण्याबद्दल आहे, तो आपल्याकडे नाही. कुठे येणारे पाणीच दूषित आहे, तर कुठे वितरण व्यवस्थेत दोष आहे. आपल्याकडे कोणीही, कुठेही, कसेही अनधिकृत नळ कनेक्शन घेतात. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने जोडले की नाही, याचाही कोणी विचार करत नाही. त्यातून गटाराचे पाणी नळात मिसळते. पाइपलाइनमधून सतत पाणी वाहते राहिले, तर ठीक, मात्र आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे पाणी वाहते नसताना तेथे निगेटिव्ह प्रेशर तयार होऊन बाहेरचे पाणी आत ओढले जाते. तेच पाणी नळाद्वारे आपल्यापर्यंत येते. हे थांबवावे, असे कोणालाही वाटत नाही.

मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी, अशा एकूण सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या धरण परिसरात कुठेही उद्योगधंदे नाहीत. या धरणांमध्ये येणाऱ्या पाण्यात केमिकल किंवा अन्य काही मिसळलेले नसते. मुळात सगळ्यात चांगले पाणी मुंबईला येते. मुंबईचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट अतिशय चांगले आहेत, तरीही ६० ते ७० टक्के मुंबईत दूषित पाणीपुरवठा होतो. मुंबईत अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पाइपलाइन आहे. ठिकठिकाणी जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आहेत. त्यांना गळती लागलेली आहे. आजूबाजूचा अस्वच्छ परिसर, बेलगाम अनधिकृत नळ कनेक्शन, त्यात अस्वच्छ पाणी मिसळल्यामुळे वितरण व्यवस्थेतून दूषित पाणीपुरवठा होतो. महापालिकेने ठरवले, तर हे सहज रोखता येईल, पण असे ठरवले, तर अनधिकृत कनेक्शन तोडावी लागतील. त्यातून राजकीय नेत्यांच्या व्होट बँकेला धक्का बसेल. ते होऊ द्यायचे नसेल, तर मुंबईकरांनी थोडे दूषित पाणी प्यायले तर काय होते, ही भावना भयंकर आहे.

याचा अर्थ, महापालिका काहीच करत नाही असे नाही, पण जे होत आहे ते पुरेसे नाही. पालिकेकडून रोज १५० - १८० नमुने तर पावसाळ्यात २०० - २५० पाण्याचे नमुने विविध वॉर्डांतून गोळा करून तपासले जातात. पिण्याच्या पाण्याच्या भारतीय मानकानुसार पाणीपुरवठ्यातील पिण्याचे पाणी कोलिफोर्म आणि ई-कोलाय या जीवाणूंपासून मुक्त असले पाहिजे. २०२४-२५च्या अहवालानुसार मुंबईतील दूषित पाण्याची सर्व वॉर्डांतील सरासरी टक्केवारी ०.४६ इतकी आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, शुद्धतेच्या जागतिक मापदंडानुसार शहरी भागात ५ टक्के, तर ग्रामीण भागांत १० टक्के पाणी अशुद्ध असेल, तर तुम्ही चांगले काम करता, असा निष्कर्ष पालिका अधिकारी काढतात. या मापदंडानुसार जर आपण काम करत राहणार असू, तर कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांची उदाहरणे फक्त वाचण्यापुरती राहतील आणि आपल्या महापालिकेच्या नावाने बोट मोडण्याशिवाय आपल्या हाती काहीही नसेल. 

Web Title: Their vote bank is important, you drink contaminated water...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.