लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सांताक्रुजमधील एका जैन मंदिरातून आठ लाख ३४ हजार रुपयांचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या आरोपीचा सलग चार दिवस पाठलाग करून मध्य प्रदेशच्या भोपाळमधून गाशा गुंडाळण्यात सांताक्रुज पोलिसांना बुधवारी यश आले. सुशांन मिरिधा (३३), असे अटक आरोपीचे नाव असून, तो रात्रीच्या वेळी घरफोडी करण्यात पटाईत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी यांच्या सांताक्रुजमधील हेमो अँड एल्व सोसायटीत हे जैन मंदिर आहे. १४ जुलैला फिर्यादी यांचे वडील बिपीन गांधी हे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मंदिरात पूजेसाठी गेले असता त्यांना मंदिराचा लाकडी दरवाजा उघडा, तर लोखंडी स्लायडिंगचे गेट तुटलेले आढळले. गांधी कुटुंबीयांना मंदिरात सोन्या-चांदीच्या मूर्ती व अन्य दागिने मिळून आठ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
सांताक्रुज पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. सांताक्रुज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश शिंदे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय कल्हाटकर आणि अंमलदार केणी, सालदूरकर, शिपाई हिरेमठ, माने, दिवाणजी आणि स्वप्नील काकडे यांनी तपासात परिसरातील २०० ते ३०० सीसीटीव्ही फुटेज पडताळले. खबरीच्या मदतीने आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवून ‘सीडीआर’मार्फत त्याचे लोकेशन भोपाळला असल्याचे कळाले होते.
१५ गुन्ह्यांची नोंद
आरोपी सुशांन मिरिधा याच्या नावावर जुहू पोलिस ठाण्यात १२, डीएननगरमध्ये एक, तर सुरतच्या पांडेसरा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.