Join us  

नाट्यगृह चांगले पण जास्त भाड्यामुळे निर्माते गांजले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 8:05 AM

नाट्यगृहांवरील मालिका सुरू करून प्रत्येकाला एका नाट्यगृहाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानतो.

चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): मागील २० वर्षांमध्ये ठाण्याचा चोहोबाजूंनी विस्तार झाला. गावातील प्रेक्षकवर्ग वसंत विहार, पोखरण रोड बाजूला स्थलांतरित झाले. या सर्वांसाठी डॉ. काशिनाथ घाणेकर हे अतिशय उत्तम नाट्यगृह उभारण्यात आले. ते इतके सुंदर आहे की, ज्याची कोणाची ही कल्पनाशक्ती होती त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. दुपारी गडकरीला आणि रात्री काशिनाथला प्रयोग केला तरी दोन्हीकडे प्रेक्षक वेगळा असतो. नाट्यगृहाची वास्तू चांगल्या स्थितीत आहे. पार्किंगसाठी मोठी जागा आहे. देखभाल चांगली केली जाते, पण निर्माता-दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून काही अडचणीही आहेत, ज्यांचा महापालिकेने विचार करावा. नाट्यगृहांवरील मालिका सुरू करून प्रत्येकाला एका नाट्यगृहाबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानतो.

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मेकअप रूम्स, स्वच्छतागृहे, व्हीआयपी रूम, वातानुकूलित यंत्रणा चांगल्या स्थितीत आहेत, पण हे नाट्यगृह महापालिकेच्या अंतर्गत असूनही इतर नाट्यगृहांपेक्षा याचे भाडे खूप जास्त आहे. त्यामुळे इथे प्रयोग लावताना निर्मात्यांना खूप विचार करावा लागतो. निर्मात्यांच्या नफा-तोट्याच्या व्यस्त प्रमाणाचा महापालिकेने विचार करावा. कदाचित प्रेक्षकसंख्या जास्त असल्याने जास्त भाडे घेतले जात असेल, पण तसे न करता निर्मात्यांना दिलासा द्यावा. सर्व नाटकांना हाऊसफुल्ल बुकिंग होत नसल्याने नाट्यगृहाच्या भाड्यात ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी या निमित्ताने करावीशी वाटते. इतर नाट्यगृहांचाच दर काशिनाथला लागू करावा.

नाट्यगृह भव्य-दिव्य असले तरी एक उणीव जाणवते. सांस्कृतिक मेळावे, वाहिन्यांचे कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमांसाठी हे नाट्यगृह चांगले असले तरी इथे नाटकाचा उत्तमरीत्या अनुभव घेता येत नाही. रंगमंचावर माईकपाशी उभी राहिलेली व्यक्ती आणि प्रेक्षक यांच्यात जवळपास १५ ते २० फुटांचे अंतर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा अनुभव घेताना आणि कलाकारांना प्रतिक्रिया जाणून घेताना अडचणी येतात. यासाठी आसनव्यवस्था पुढे घ्यायला हवी. त्यामुळे आसन संख्याही वाढू शकेल. 

ठाणे महापालिकेने इकडे लक्ष द्यावे 

रंगमंच खूप मोठा असल्याने कमी व्यक्तिरेखांचे किंवा छोटे नेपथ्य असलेले नाटक पाहताना ते काहीसे विचित्र दिसते. त्याला सर्व बाजूंनी कव्हर करताना नाकीनऊ येतात. नाट्यगृहाची जाण असलेल्या नेपथ्यकार-तंत्रज्ञांच्या सल्ल्याने या कमानी रंगमंचाची सुधारणा करावी. रंगकर्मींसाठी नाट्यगृह सोयीस्कर होण्यासाठी इमारत बांधण्यापूर्वीच नाट्यकर्मींमधील जाणकारांची समिती नेमून त्यांचा सल्ला घ्यावा. नाटकासारख्या परफॉर्मिंग आर्टस्साठी आणि राजकीय मेळाव्यांसाठी वेगवेगळी थिएटर्स असावीत, अशी सर्व नाट्यकर्मींची कळकळीची विनंती आहे. नाटकाचे अर्थशास्त्र छोटे असून, गरज मोठी असल्याने सर्व सुविधा द्याव्यात. नाटक हे मराठी संस्कृतीचे महत्त्वाचे अंग असल्याने शासनाने, महापालिकेने त्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे.

प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया...

पहिल्या रांगेत बसूनही नाटक लांबून पाहात असल्यासारखे वाटते. यासाठी आसने पुढे घेऊन अंतर कमी करण्याची गरज आहे. मागच्या रांगेतील प्रेक्षकांनाही खूप अडचणी येतात. नाटकासाठी असलेल्या या नाट्यगृहामध्ये इतर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. त्याऐवजी नाटकांना प्राधान्य देण्यात यायला हवे. सोहळे नव्हे, आम्हाला नाटक पाहायचे आहे.

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहविषयी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आपल्या भेटीला आले आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता. 

टॅग्स :चंद्रकांत कुलकर्णीनाटक