लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन वर्षात स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग खुला झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमआरडीएकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे ११,८०० चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारले जात आहे. या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २५० कोटी खर्च येणार आहे. या कामाला मार्च २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील स्मारकाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. २५ डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. स्मारक परिसरात ११५ वर्षे जुना महापौर बंगलाही आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाच्या ६०२ चौ.मी. क्षेत्रफळावरील इमारतीचे जतन, संवर्धन करण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवेशद्वार इमारत, इंटरप्रिटेशन सेंटर आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले. इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये संग्रहालय, ग्रंथालय, कलाकार दालन यांचा समावेश आहे. बहुद्देशीय सभागृहांचाही स्मारकात समावेश असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणारदुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, चित्रपट, व्हर्चूअल रिअलिटी, हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञानविषयक कामे केली जाणार आहेत. तसेच दृकश्राव्य माध्यमातून कथा सांगितली जाणार आहे. एमएमआरडीएने या कामासाठी सल्लागार म्हणून आभा लांबा असोसिएटची नियुक्ती केली आहे.
पहिल्या टप्प्यात काय असणार? महापौर निवासस्थानाच्या ६०२ चौ. मी. क्षेत्रफळावरील इमारतीचे जतन, संवर्धन करणे. प्रवेशद्वार इमारत ३१०० चौ. मी क्षेत्रफळावर उभारली जात आहे. तळमजला आणि त्यावर दोन मजले असतील. त्यामध्ये कार पार्किंग, दोन मल्टिपर्पज हॉल, दोन मिटिंग रूम असतील. इंटरप्रिटेशन सेंटर हे १५३० चौ. मी. क्षेत्रफळावर बांधण्यात आले. यामध्ये संग्रहालय, डिजिटल लायब्ररी व गॅलरी, तीन वॉटर बॉडिज असतील. प्रशासकीय इमारत ही ६३९ चौ.मी. क्षेत्रफळावर असून, त्यामध्ये ट्रस्टचे कार्यालय, कॉन्फरन्स कक्ष, उपाहारगृह असेल.