Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पत्नीनेच आवळला पतीच्या प्रेयसीचा गळा; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत टाकून नाल्यात फेकला

By मनीषा म्हात्रे | Updated: October 7, 2022 22:54 IST

नेहरू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०५ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बंदर भवन समोरील नाल्यात एक संशयास्पद गोणी पडल्याचा संदेश प्राप्त झाला.

मुंबई : पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून २५ वर्षीय पत्नीनेच बहिण आणि मैत्रीणीच्या मदतीने पतीच्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत टाकून नाल्यात फेकल्याची खळबळजनक घटना कुर्ला येथे घडली आहे. या हत्याकांडाची उकल करत नेहरु नगर पोलिसांनी तिन्ही महिलांना बेड्या ठोकल्या आहेत.नेहरू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०५ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बंदर भवन समोरील नाल्यात एक संशयास्पद गोणी पडल्याचा संदेश प्राप्त झाला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच नेहरु नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणीची तपासणी केली. त्यात  एका महिलेचा कुजलेला मृतदेह त्यांना आढळला.

महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरुन नाल्यात फेकल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने नेहरू नगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुर्ला पूर्वेकडील नवजीवन रहिवाशी संघ येथून दोन संशयित महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. चौकशीत आरोपी मिनल पवार (२५) हिने तिच्या पतीचे मृत महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून बहिण शिल्पा पवार (२५) आणि मैत्रीण प्रज्ञा उर्फ डॉली भालेराव (२५) यांच्या मदतीने कट रचून मृत महिलेची ०१ ऑक्टोबरच्या पहाटे अडीज वाजता गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याची कबुली मिनल हिने पोलिसांना दिली. तिन्ही महिलांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपती- जोडीदारपोलिस