Join us

महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ! नायट्रेटचे प्रमाण योग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:15 IST

भूजल गुणवत्ता अहवालातील निष्कर्षांची भीती संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्र सरकारच्या भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४’ नुसार राज्यातील सात जिल्ह्यांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात नेमके किती प्रमाणात नायट्रेट किती हे तपासण्याची वेळ आली आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण योग्य मर्यादेत असल्याचे समोर आल्याने दीड कोटी मुंबईकरांना पुरवले जाणारे पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि शुद्ध असल्याचा दावा आता करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ‘बीआयएस’ निकषांनुसार ४५ मिलीग्रॅम प्रतिलिटरपर्यंत नायट्रेटचे प्रमाण असेल, तर पाणी पिण्यास योग्य असते. त्यापेक्षा अधिक नायट्रेटचे प्रमाण आरोग्यास हानिकारक ठरते. मुंबईत सुमारे १२५ किलोमीटर अंतरावरून ठाणे जिल्ह्यातून पाणी आणले जात असले, तरी विविध टप्प्यांवर त्याची शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते. जवळपास सहा हजार किमी लांबीच्या वितरण वाहिन्यांद्वारे हा पुरवठा केला जातो. महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात नायट्रेटचे प्रमाण निश्चित मानकांनुसार मर्यादेतच असल्याची माहिती आता पालिका आधिकाऱ्यांनी दिली आहे.

लहान बालकांना धोका सर्वाधिक

  • अनेकदा जमिनीत मुरलेली प्रदूषके आणि घातक रसायने जलस्तरांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे जलस्तराचे पाणी दूषित होते. एवढेच नाही, तर जलस्तरामार्फत ते दूर अंतरापर्यंत पोहोचते. 
  • पाण्यात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होणे, ही गंभीर बाब असून यामुळे पर्यावरण आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो.
  • ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ सारख्या आरोग्य समस्या त्यातून उद्भवू शकतात. रक्ताभिसरणासंबंधातील आजारही निर्माण होतात.

शुद्धतेबाबत तपासण्या

मुंबईत शुद्ध झालेल्या पाण्याच्या वितरणापूर्वी विविध चाचण्या होतात. पाण्याचे रॉ, क्लॅरीफायर, फिल्टर आणि फायनल असे वर्गीकरण करून तपासणी केली जाते. शुद्धीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात मशीनद्वारे तपासलेले पाणी इथे पुन्हा तपासले जाते. विविध चाचण्या केल्या जातात आणि मगच ते वाटपासाठी सोडले जाते.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे

  • तानसा धरण
  • मोडकसागर धरण
  • अप्पर वैतरणा धरण
  • विहार धरणे धरण
  • तुळशी धरण
  • भातसा धरण
  • मध्य वैतरणा धरण
टॅग्स :पाणी