Join us  

‘आरे’त मेट्रो ६ चे साहित्य साठविण्यासाठी जागेचा वापर; पर्यावरणवाद्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:59 AM

आरेतील जागेचा वापर मेट्रो ६ मार्गिकेच्या बांधकाम साहित्याच्या साठवणुकीसाठी आणि कामगारांच्या कॅम्पसाठी करण्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे.

मुंबई :आरेतील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेचा वापर मेट्रो ६ मार्गिकेच्या बांधकाम साहित्याच्या साठवणुकीसाठी आणि कामगारांच्या कॅम्पसाठी करण्यावरून पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. पर्यावरणवाद्यांनी याला विरोध दर्शविला असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इको सेन्सिटिव्ह झोन सनियंत्रण समितीची परवानगी न घेताच काम सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. 

आरे वसाहतीमधील पहाडी गोरेगाव भागातील भूखंड क्रमांक ५८९ हा मेट्रो ७ मार्गिकेचे सबस्टेशन आणि मेट्रो भवन उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) देण्यात आला होता. मात्र पर्यावरणवाद्यांनी मेट्रो भवनला विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर मंडाले येथील डेपो आणि दहिसर भागात मेट्रो भवन उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. त्यामुळे हे क्षेत्र सुरक्षित राहील, अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र एमएमआरडीएकडून आता या जागेचा वापर बांधकाम साहित्याची साठवणूक व कामगारांच्या शिबिरासाठी केला जाणार आहे.

परवानगी न घेताच काम?

मेट्रो ६ मार्गिकेची उभारणी करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) आरे वसाहत प्रशासनाला पत्र पाठवून या भूखंडावरील पाच हजार चौरस मीटर जागेवर पारस रेलटेक कंपनीकडून साहित्य ठेवले जाणार आहे, असे सांगितले होते. 

त्याचबरोबर या कंपनीच्या जेसीबी, हायड्रा क्रेन, ट्रक आणि डंपर यांना गोरेगाव बाजूने आरे वसाहतीत प्रवेश करता यावा यासाठी गेट पास देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या कामांसाठी सनियंत्रण समितीची परवानगी घ्यावी. त्यानंतरच कामे करावीत, असे निर्देश आरे प्रशासनाने दिले होते. या अटीवर आरे वसाहतीत वाहने नेण्यासाठी आरे प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र एमएमआरडीएकडून परवानगी न घेताच काम सुरू असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

या जागेचा वापर केवळ मेट्रो ६ मार्गिकेचे ट्रॅक साहित्य तात्पुरत्या स्वरूपात साठवणुकीसाठी करत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जमीन मूळ स्थितीत आणली जाईल. नैसर्गिक क्षेत्राला कोणतीही बाधा आणली जाणार नाही.- वरिष्ठ अधिकारी, एमएमआरडीए 

आरे वसाहतीतील हा भूखंड ओशिवरा नदीजवळ असून, पूरक्षेत्रात आहे. पावसाळ्यात या भागात पाणी साचते. डीएमआरसीच्या कर्मचाऱ्यांकडून परवानगी न घेता या भागात भराव टाकण्याचे काम सुरू होते. मेट्रो ६ मार्गिकेचे साहित्य ठेवण्याच्या आणि कामगार शिबिराच्या बहाण्याने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात घुसण्याचा प्रयत्न आहे. त्यातून येथील पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून, त्याला विरोध आहे.- अमृता भट्टाचार्य, पर्यावरणवादी कार्यकर्त्या 

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भूखंडाबाबत तक्रारी केल्यानंतर मेट्रो भवन इतरत्र हलविले. एकीकडे मेट्रो भवन उभारले जाऊ शकत नसताना या जंगलात तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम साहित्य साठवणुकीचे काम कसे केले जाऊ शकते. तसेच या संवेदनशील भागात ट्रक नेण्यासाठी परवानगी कशी दिली? याबाबत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.- झोरू बथेना, पर्यावरणवादी कार्यकर्ते

टॅग्स :मुंबईएमएमआरडीएमेट्रोआरे