दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:38 IST2025-10-21T09:37:51+5:302025-10-21T09:38:21+5:30
तिचा आक्रोश ऐकवत नव्हता, त्या क्षणाला जे सुचले ते केले..!

दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकांवर आम्ही दोघांनी जे काही केले; ते त्या त्या क्षणी आम्हाला सुचले म्हणून. आम्ही फक्त आमचे काम करत गेलो आणि एकमेकांना धीर देत गेलो. अनुभव गाठीशी नव्हताच, पण विश्वास होता. त्या विश्वासाच्या जोरावरच त्या गोंडस बाळाला जन्म देता आला. आज जन्माननंतर बाळ आणि आई सुखरूप आहे, याचे समाधान आहेच. आपल्या बाजूला काही तरी घडते आणि आपण मदत करण्याऐवजी मोबाइल काढून त्याचा व्हिडीओ काढू लागतो. अशा वेळी आपल्यातली माणुसकी कुठे जाते? अशी वायफळ चर्चा करणाऱ्यांना डॉ. देविका देशमुख आणि सिनेमॅटोग्राफर विकास बेंद्रे यांनी माणुसकीचा धडा शिकवला.
मुंबईत काही दिवसापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर रेल्वे स्थानकातच मध्यरात्री १ ते पहाटे ३ दरम्यान बाळंतपण करणारे विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांचा मुंबई लोकमत कार्यालयात सत्कार करून 'दीपोत्सव'चा अंक भेट देण्यात आला.
त्या रात्री नेमके काय घडले, याचा थरार विकास यांनी सांगितला. राम मंदिर रेल्वे स्थानकात लोकल दाखल झाली, तेव्हा आपल्याला समोरच्या डब्यातील महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. महिलेला पहिल्यांदा मदत मिळावी, म्हणून साखळी ओढून लोकल स्थानकातच थांबविली. कारण लोकल पुढे गेली असती, तर आणखी अडचण झाली असती. रात्री रेल्वे स्थानकांत महिला पोलिस नव्हत्या. पुरुष पोलिस, इतर कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांच्या मदतीने गर्भवती महिलेला मदत करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला रक्त पाहिल्यानंतर काहीच सुचत नव्हते, पण धीर सोडला नाही. मी माझ्या ओळखीच्या डॉ. देविका यांना व्हिडीओ कॉल केला. तेवढ्या रात्री त्यांनीही तो घेतला हे महत्त्वाचे.
सगळे काही नियंत्रणात झाले हे बरे झाले. समजा नियंत्रणाबाहेर गेले असते तर... याची कल्पनाही करवत नाही, असेही डॉ. देविका म्हणाल्या. माझ्या आई-बाबांना घडलेला प्रकार मी सकाळी सांगितला, तेव्हा ते दोघे डॉक्टर असूनही त्यांना काही क्षण धक्काच बसला होता, पण नंतर त्यांना माझा अभिमान वाटला. अडचणीत सापडलेल्या एका महिलेसाठी त्या क्षणाला आम्ही दोघे धावून गेलो, ही घटना आयुष्यभर मनात कायम राहील...
बाळाचा जन्म झाला आणि मीच रडलाे..!
देविका यांनी रात्री १ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत जे मला सांगितले ते मी व्यवस्थित करत गेलो. हे सगळे करताना माझे हात थर थर कापत होते. नशीब बलवत्तर म्हणून सगळे नीट झाले. दरम्यान, रेल्वे स्थानकांत महिला पोलिस नव्हती. रुग्णवाहिका नव्हती. ३ वाजता रुग्णवाहिका आली. या सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या असत्या, तर आणखी चांगले झाले असते. बाळाचा जन्म सुखरूप झाला, तेव्हा मीच खूप रडलो. अर्थात, ते आनंदाश्रू होते. बाळाच्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू होते. ही घटना मी माझ्या आईला सांगितली, तेव्हा तिला हे खरेच वाटत नव्हते.
मन स्थिर करून सगळ्या सूचना देत होते..
रात्री उशिरा कॉल म्हणजे तो इमर्जन्सी साठीच, याची मला सवय आहे, पण अशा कामासाठी फोन येईल असे कधीच वाटले नव्हते. विकासला पॅनिक न होऊ देता मी देखील माझे मन स्थिर करून त्याला सगळ्या सूचना देत होते. तेव्हाची परिस्थिती अवघड होती. मी सांगितल्यानंतर तो देखील प्रत्येक गोष्ट दोन वेळा विचारत होता. कारण ‘ध’ चा ‘मा’ व्हायला नको होता. जर असे काही झाले असते तर गुंतागुंत झाली असती. मात्र, त्याने देखील प्रसंगावधान दाखवत सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या. बाळाचा जन्म सुखरूप झाला याचा आनंद आहे.
----००००----