लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुसळधार पावसात घरी परतताना वाहतूक पोलिसांनी थांबवले. सीट बेल्ट लावा, तुमचे रक्षण करेल म्हणत पोलिस पुढे निघून गेला. काही मिनिटांतच भीषण अपघात झाला मात्र सीट बेल्टमुळे चालक आणि त्याची पत्नी थोडक्यात बचावले. या घटनेनंतर भावनिक पोस्ट करून तो पोलिस आमच्यासाठी देवदूत ठरल्याचे गौतम रोहरा यांनी म्हटले आहे.
गौतम रोहरा हे रविवारी पत्नीसोबत कारने घरी जात होते. त्यावेळी बीकेसी येथे वाहतूक पोलिस अंमलदार प्रवीण क्षीरसागर यांनी थांबवले. मुसळधार पावसामुळे त्यांनी रोहरा यांना वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मॅडमने सीट बेल्ट लावलेला नाही, सीट बेल्ट न लावता प्रवास केल्याबद्दल हजार रुपयांचा दंड आहे. दंड महत्त्वाचा नाही. अपघात झाला तर सीट बेल्टने प्राण वाचू शकतात.
कृपया सीट बेल्ट लावल्याशिवाय पुढे जाऊ नका, असे प्रवीण यांनी सांगितले. त्यानंतर गौतमच्या पत्नीने सीट बेल्ट लावला. दोघांनीही पोलिसांचे आभार मानून घरच्या दिशेने निघाले. अवघ्या १५ मिनिटांत अंधेरी फ्लायओव्हर उतरतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडी दोनदा उलटली, पण दोघेही भीषण अपघातातून वाचले.
तरुणाला समुद्रातून काढले बाहेर
नेव्ही नगर येथे समुद्रात शनिवारी रात्री एक तरुण आत्महत्या करण्यासाठी बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाला सुखरूप बाहेर काढले. चौकशीत त्याचे नाव योगेश नारायण सिंग बिश्व (३४) असून तो कफ परेड येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करत वडिलांच्या ताब्यात दिले.
वाहतूक पोलिस माझ्यासाठी देवदूत ठरला
तो वाहतूक पोलिस आमच्यासाठी देवदूत ठरला. आमचे प्राण वाचले, ते फक्त त्याच्या जबाबदारीमुळे. अशा वेळी आपले छुपे रक्षक कुठूनही येऊ शकतात. वाहतूक पोलिस केवळ दंडासाठी नव्हे, तर आपली सुरक्षा बघतात. म्हणून त्यांच्यावर कधीही रागावू नका. सरकारचे नियम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच आहेत. त्याचे पालन करा, असा सल्ला देत गौतम यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे पोलिसांचे आभार मानले.
पोलिसाचा आणि जीवनाच्या या दुसऱ्या संधीचा मनापासून आभारी आहे. थोड्याशा काळजीमुळे आज आमचे घरटे सुरक्षित आहे.- गौतम रोहरा