सायन पुलाच्या उद्घाटनाला सापडला मुहूर्त पूल १५ ऑगस्टला होणार वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 08:03 IST2026-03-08T08:02:58+5:302026-03-08T08:03:43+5:30
सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला असून १५ ऑगस्ट रोजी पूल वाहतुकीस खुला होईल, असे पालिकेच्या पूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

सायन पुलाच्या उद्घाटनाला सापडला मुहूर्त पूल १५ ऑगस्टला होणार वाहतुकीसाठी खुला
मुंबई : मुंबई शहराला उपनगराला जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला असून १५ ऑगस्ट रोजी पूल वाहतुकीस खुला होईल, असे पालिकेच्या पूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सायन रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेने पालिकेकडे सोपवले आहे. हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधून जात असल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. या कामासाठी येणारा पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे. मात्र, पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम मुंबई महापालिकेने करावे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले होते.
बांधकाम पद्धतीत बदल
पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम करताना काही अडथळे निर्माण झाल्यामुळे मूळ बांधकाम पद्धतीत बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली असून, त्याबाबत मध्य रेल्वेची मंजुरी देखील घेण्यात आली आहे. या बदलांमुळे आता सायन रेल्वे स्थानकावरील पुलाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या पुलाच्या पोहोच रस्त्याच्या बांधकामामुळे खर्च ७ कोटीने वाढला असून तो ४९ कोटी ९६ लाख ४३३ रुपयांवर गेला आहे.
कामाचे नियोजन आणि कंत्राट
तांत्रिक सल्लागार : मुंबई महापालिका हद्दीतील पोहोच रस्त्याच्या कामाचा आराखडा, नियोजन आणि संकल्पचित्रे तयार करण्यासाठी ‘मे. स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रा. लि.’ यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर पोहोच रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ‘मे. नीरज सिमेंट स्ट्रक्चरल लि.’ यांची नियुक्ती करण्यात आली असून, या कामाची किंमत अंदाजे २१,४४,९४,६९२ रुपये इतकी आहे.