गुढीपाडव्याचा मुहूर्तही आता हुकला; बीडीडीवासीयांना नवे घर कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:07 IST2025-04-03T09:07:41+5:302025-04-03T09:07:52+5:30
BDD Chowl News: वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्याने टॉवर बांधले जात असून, या इमारतींमध्ये ५५० कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाकडून गृह प्रवेश दिला जाणार होता. मात्र, फिनिशिंगची कामे अद्याप सुरू असल्याने रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडला आहे.

गुढीपाडव्याचा मुहूर्तही आता हुकला; बीडीडीवासीयांना नवे घर कधी?
मुंबई - वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्याने टॉवर बांधले जात असून, या इमारतींमध्ये ५५० कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाकडून गृह प्रवेश दिला जाणार होता. मात्र, फिनिशिंगची कामे अद्याप सुरू असल्याने रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडला आहे. दरम्यान, गृहप्रवेश रेंगाळला असतानाच दुसरीकडे रहिवाशांना इमारतीच्या प्रवेशासंदर्भातील अडचणींना सामोरे जावे लागत असून, याबाबत रहिवासी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
येथील ५५० कुटुंबांना गृह प्रवेश करता यावा म्हणून पुनर्विकसित दोन विंगचे काम वेगाने पूर्णत्वास नेले जात आहे. मात्र, वरळी येथील पोलिस इमारती रिक्त करून त्या संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जुन्या पोलिस इमारतींमुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे, असे अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सांगितले.
राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप वाढला
गेल्या काही महिन्यांपासून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात राजकीय तसेच बाहेरील व्यक्तींचे हस्तक्षेप वाढले आहेत. म्हाडाचे अधिकारी स्थानिक रहिवाशांचे कमी आणि राजकीय व्यक्तींचे अधिक ऐकतात, असा आरोप आता रहिवासी करत आहेत. स्थानिक रहिवाशांचे ऐकून वहिवाटेचा मार्ग निकाली काढल्यास पुढच्या अडचणी मिटतील. मात्र, याबाबत म्हाडा तोडगा काढत नाही, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे.
प्रवेशद्वारातील रहदारीचा प्रश्न अनुत्तरितच
नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. येथे रहदारीचा मार्ग नाही. म्हाडाने हा विषय निकाली काढावा.
पोलिस वसाहती संक्रमण शिबिरासाठी देऊ नयेत, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. येथील ५५० कुटुंब सध्या श्रीनिवास आणि सेंच्युरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत.
वरळीत १२१ बीडीडी चाळी असून, यात सुमारे १० हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांच्यासाठी एकूण ३३ इमारती बांधल्या जातील. त्यापैकी ८ इमारतींचे काम ४० मजल्यापर्यंत झाले आहे. सर्व इमारती ४० मजल्यांच्या बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीमध्ये काही ठिकाणी २८०, तर काहींत २८८ घरे आहेत.