लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग/मुंबई : येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट अचानक लागलेल्या आगीत खाक झाली. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. यामध्ये बोटीचे १ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले. दुर्घटनाग्रस्त बोटीत सुरक्षा म्हणून छोटी होडी असल्याने बोटीवरील १८ खलाशांचा जीव वाचला. पहाटे आग लागल्यानंतर तटरक्षक दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. सहा तासानंतर या बोटीचा सांगाडा अलिबाग समुद्रकिनारी आणण्यात आला.
‘एकवीरा माऊली’ असे या बोटीचे नाव आहे. बोट खोल समुद्रात मासेमारी करून परतीच्या मार्गावर होती. पहाटे चारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने बोटीला आग लागली. खलाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आग भडकल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले.
अरबी समुद्रात सकाळी गस्त घालत असताना तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले जहाजावरील जवानांना दूर किनाऱ्यावर काहीतरी जळत असल्याचे दिसले. त्या दिशेने तटरक्षक दलाचे जहाज ताबडतोब वेगाने सुमारे सव्वासात वाजता पोहोचले. त्यावेळी मच्छीमारांच्या ‘एकविरा माऊली’ या बोटीला आग लागल्याचे दिसून आल्यानंतर तातडीने तटरक्षक दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली.
यंत्रसामग्रीही निकामीबोटीचे मोठे नुकसान झाले. जाळी, मच्छीमारीसाठी लागणारी अवजारे जळून खाक झाली. बोटीतील यंत्रसामग्रीही निकामी झाली आहे. सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.
तटरक्षक दलाची मदतदुर्घटनाग्रस्त बोटीवरील मच्छीमारांच्या भाजलेल्या जखमांवर उपचार करून त्यांना तातडीची मदत देण्यात आली तसेच पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती तटरक्षक प्रशासनाने दिली आहे.
पहाटे बोटीला आग लागल्याचे कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा पाया फक्त राहिला. या बोटीला खेचत जेटीवर आणले. दुर्घटनेमुळे आमचे १ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले आहे.राकेश गण, बोटीचे मालक
मालवाहतूक बोटीची उत्तनच्या मच्छीमार बोटीला धडकमीरा रोड : भाईंदरच्या उत्तन गावातील ‘स्वर्गदीप’ या मासेमारी बोटीला खोल समुद्रात शुक्रवारी ‘अद्वैता मुंबई’ या खासगी मालवाहतूक जहाजाने धडक दिली. यात मासेमारी बोटीचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघातप्रकरणी जहाज चालक, मालकावर गुन्हा दाखल करावा व मच्छीमारांना बोटीच्या नुकसानाची भरपाई द्यावी. शासनाकडून तातडीने पंचनामा होऊन मच्छीमारांना न्याय मिळावा, अशी मागणी मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी केली आहे.