Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: भोंग्याचा विषय कायमचा संपवायचाय; राज ठाकरेंनी पत्रातून केलं नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 06:26 IST

भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे.

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांसाठी दोन पानी पत्र तयार केले आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पत्र घरोघरी पोहचविण्याची मोहीम आखण्यात आली आहे. 

भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. स्वाक्षरी मोहीम, भोंग्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणे अशा माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी या पत्रात केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषेत हे पत्र तयार करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे पत्र घराघरांत पाठवण्याची सूचना करताना कोणीही यात कुचराई करू नये, असा सज्जड दमही राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईतील ९२ टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनाचा परिणाम दिसल्याचा  दावा करतानाच राज यांनी नागरिकांना तीन गोष्टी करण्याचे आवाहन पत्राद्वारे  केले आहे. भोंग्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ज्या ठिकाणी पालन होत नसेल त्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना त्याची माहिती द्यावी, जर ध्वनीक्षेपकाचा त्रास झाला तर १०० क्रमांक डायल करून पोलिसांना माहिती देणे किंवा पोलिसांच्या ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करून माहिती द्यावी तसेच हे पत्र घेऊन येणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा क्रमांक सेव्ह करून ठेवा. तुमच्या अडीअडचणींच्या वेळेत महाराष्ट्र सैनिक धाऊन येईल, असे आवाहन राज ठाकरे यांनी या पत्रात केले आहे.

पत्रात अनेक प्रश्नांवरही भाष्य 

भोंग्यांसोबतच महाराष्ट्रातील अन्य प्रश्नांवरही राज यांनी या पत्रात भाष्य केले आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यामुळे जनता होरपळली आहे.

बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसी रूप धारण करीत आहेत. हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच. पण, मानसिक आणि सामाजिक शांतता तितकीच महत्त्वाची आहे. भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडविला तसेच इतरही प्रश्नही एकत्रितपणे सोडवू. पण, भोंग्यांचा विषयाचा एकदा तुकडा पाडूनच टाकूया, असे खुले आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या पत्राद्वारे केले आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे