लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वर्षानुवर्षे पावसाळ्यात गळके आणि उन्हाळ्यात कडक उन्हाने तापलेले सीलिंग अशा परिस्थितीत तिसऱ्या मजल्यावरील १८० चौ.फूट घरात आयुष्य काढल्यानंतर वरळी-बीबीडीवासीय आता ३९ व्या मजल्यावर २ बीएचके घरात राहायला जाण्याच्या आनंदात आहेत. चाळीतील खोलीतून ५०० चौ. फूट फ्लॅटमध्ये जाणाऱ्या सगळ्याच रहिवाशांकडून जणू आकाश ठेंगणे झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
वरळीतील ३० नंबरच्या बीडीडी चाळीत गेली ३० वर्षे राहणाऱ्या गजानन शिरकर यांच्या कुटुंबाचा आनंदही सध्या गगनात मावेनासा झाला आहे. वरळी, नायगांव, डीलाईल रोड, शिवडी येथील बहुतांश बीडीडी इमारती शंभर वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यामुळे तिसरा मजल्यावरील राहिवाशांसाठी पावसाळ्यात पाणी गळती आणि उन्हाळ्यात असह्य उष्णता, पाचवीला पुजलेली असायची. आता या त्रासातून सुटका होणार असल्याने हजारो कुटुंबे आनंद साजरा करत आहेत.
यातील पहिल्या टप्प्यातील ४० मजली इमारतीत साधारण ५५० कुटुंबांना नव्या घराचा ताबा मिळणार आहे. ‘नशिबाने साथ दिली. ४० माळ्याच्या इमारतीत लॉटरीत ३९ वा मजला मिळाला. ४० वा मिळाला असता, तर शेवटच्या मजल्याच्या वेदना पुन्हा सहन झाल्या नसत्या. ३९ व्या मजल्यावर खरंच सुखाची झोप येईल आता, अशी प्रतिक्रिया शिरकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
अखिल बीडीडी चाळवासीय भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस आणि एक बीडीडी चाळ रहिवासी किरण माने यांनीही रहिवाशांना नव्या घरच्या चाव्या मिळणार याबाबत आनंद व्यक्त केला आणि संघटनेने केलेल्या कामाचे चीज होत आहे, असे सांगितले.
टॉवरमध्ये झळकल्या नावांच्या पाट्या
नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता इमारतीच्या तळमजल्यावर घरमालकांच्या नावाच्या पाट्याही लागल्या आहेत. या पाटीवर आपली नावे पाहून अनेक जुने रहिवासी भावूक झाले आहेत. अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचा अनुभव येथील रहिवासी घेत आहेत.
तळमजला ते ३० वा मजला
सुरेश खोपकर, बीडीडी चाळीत तळमजल्यावरील रहिवासी आता ३७ व्या मजल्यावरून वरळी न्याहाळणार आहेत. तर पहिल्या मजल्यावरील रहिवासी गणेश शिंदे यांना ३० वा मजल्यावरील घर लॉटरीमध्ये लागल्याने समाधान व्यक्त केले. ‘माझ्या मुलाला खूप आनंद झाला. तो तर म्हणाला आणखी वरचा मजला मिळायला हवा होता. पण, ३० वरही तो खूप खूश आहे, हे कमी नाही,’ अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.
नव्या घरात गणेशोत्सव साजरा करू द्या : आदित्य
वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ घरे तयार आहेत. त्याच्या चाव्या त्यांना तत्काळ द्या, नव्या घरात त्यांना गणेशोत्सव साजरा करू द्या, अशी मागणी उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या बीडीडी चाळवासीय भाड्याच्या घरात अथवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. त्यांना घरे मिळाल्यास रिकाम्या होणाऱ्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पुढील टप्प्यातील लाभार्थ्यांचे स्थलांतर करून या प्रकल्पाला गती मिळेल. यासाठी फेज १ अंतर्गत पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यासाठी येत्या आठवड्यात चावी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असेही आदित्य यांनी पत्रात म्हटले आहे.