Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास! २ दिवसांत १२ हजार ३०० होर्डिंगवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 10:03 IST

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणे किंवा खासगी मालमत्तांच्या ठिकाणी लावण्यात आलेले सर्व होर्डिंग, पोस्टर बॅनर तत्काळ हटविण्यात यावे, अशा सूचना पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरांमध्ये दोन दिवसांमध्ये १२ हजार ३०० होर्डिंग, पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहेत. पोस्टर्स, होर्डिंग्जवरील कारवाईबाबत पालिका ‘ऍक्शन मोड’वर आल्याचे दिसून आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे पालन व कार्यवाहीबाबत पालिका आयुक्तांनी सोमवारी सर्व अतिरिक्त पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त, सर्व प्रमुख अभियंता यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी आचारसंहितेनुसार, पालिकेच्या सर्व विभागस्तरावरील सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागात  राजकीय होर्डिंग, बॅनर, पोस्टर दिसणार नाहीत, हे सुनिश्चित करावेत. 

पुढील २४ तासांमध्ये सर्व होर्डिंग, बॅनर, पोस्टर काढून टाकून ते पुन्हा लावले जाणार नाहीत याची खात्री करावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

दिरंगाई केल्यास निलंबनाची कारवाई -

१)  सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार पोस्टर्स किंवा होर्डिंग्ज लावणाऱ्यावर पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

२) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमांच्या अधीन राहून होर्डिंग, बॅनर, लावण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यासाठी सर्व २५ विभागांच्या कार्यालयात एकल खिडकी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देशही आयुक्त डॉ. चहल यांनी दिले. 

कोनशिला झाकून ठेवा - आयुक्त 

शहरात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण झाल्याने त्या ठिकाणी कोनशिला लावण्यात आलेल्या आहे. या कोनशिलांवर मंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांची नावे नमूद असल्याने या कोनशिला कापड किंवा कागदाने झाकून ठेवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना चहल यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४नगर पालिका