दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:46 IST2025-12-03T10:45:00+5:302025-12-03T10:46:52+5:30
दोन गिधाडे आता १५ महिने जंगलातील नैसर्गिक अधिवासात जगून मध्य प्रदेशातील अरण्यात स्थायिक झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गिधाड संवर्धनासाठी मोठी आशा निर्माण झाली आहे.

दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
मुंबई : हरयाणातील पिंजोर येथील बंद पक्षीगृहात जन्मलेली आणि महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात २०२४मध्ये सोडण्यात आलेली दोन गिधाडे आता १५ महिने जंगलातील नैसर्गिक अधिवासात जगून मध्य प्रदेशातील अरण्यात स्थायिक झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गिधाड संवर्धनासाठी मोठी आशा निर्माण झाली आहे. दोन गिधाडांची ही महत्त्वपूर्ण यशोगाथा असल्याचा दावा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केला आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी २५ वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी काम करत आहे. हरयाणा वन विभाग, पर्यावरण व वन मंत्रालय आणि रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन फॉर बर्ड्स यांच्या साहाय्याने बीएनएचएसने पिंजोर येथे भारतातील पहिले गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र उभारले आहे.
प्रशिक्षण देऊन सोडले होते जंगलात
२७ जानेवारी २०२० रोजी पिंजोरमध्ये बंद पक्षीगृहात जन्मलेली दोन गिधाडे संगोपनाखाली मोठी झाली. जानेवारी २०२४मध्ये इतर १० गिधाडांसह त्यांना महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आणले. पेंच प्रशासन व बीएनएचएसने सहा महिने प्रशिक्षण देऊन त्यांना १० ऑगस्ट २०२४ रोजी जंगलात सोडले.
दोन्ही पक्ष्यांना एन ०१ आणि एन २४ अशी नावे देण्यात आली. मुक्ततेनंतर केवळ १२ दिवसांत एन २४ने पेंचमधील वाघाच्या शिकारीवर जगत जुळवून घेण्याची क्षमता दाखवली. पुढील काळातही एन २४ने पेंच महाराष्ट्र व पेंच मध्य प्रदेशातील नैसर्गिक शिकारींवर तसेच पुरवठा केलेल्या आहारावर जगण्याची क्षमता सिद्ध केली. -मनन सिंग, जीवशास्त्रज्ञ, बीएनएचएस
एन ०१ आणि एन २४ यांचे १५ महिन्यांचे यशस्वी जगणे हे बंदिस्त जागेत वाढवलेल्या गिधाडांना नैसर्गिक वातावरणात टिकता येते, याचे मोठे उदाहरण ठरले. १५ महिन्यांच्या यशस्वी जगण्याने गिधाड संवर्धनासाठी मोठी आशा निर्माण झाली आहे. -किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस
एन २४ कुठे कुठे फिरला?
वनात प्रवेश केल्यानंतर एन २४ मध्य प्रदेशातील पेंचमध्ये गेले. तिथून त्याने छिंदवाडा व बालाघाटात ५० किमीपर्यंत भ्रमंती केली. सध्या पेंचमध्ये हे वास्तव्यास आहे. अलीकट्टा, खावसा येथे ते भटकंती करताना दिसते.