गोष्ट नाटकाच्या अथक प्रवासाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:54 IST2025-02-23T08:54:48+5:302025-02-23T08:54:55+5:30

अनेक घटितांचा जादूमय प्रवास  संवेदनशीलतेने उलगडणाऱ्या एका दिग्दर्शकाच्या नाट्यप्रवासातील साथीदार होणं हा  सर्जनशील अनुभव आहे...

The story is about the relentless journey of drama. | गोष्ट नाटकाच्या अथक प्रवासाची

गोष्ट नाटकाच्या अथक प्रवासाची

-नीरजा

आपल्या संस्कृतीचा सारा इतिहास हा माणसाच्या स्थलांतराचा, त्या स्थलांतरातून नवी संस्कृती निर्माण करण्याचा आहे. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी  स्वतःलाच हात देत माणसं चालत राहिली, या प्रदेशातून त्या प्रदेशात; कधी समृद्धीच्या, तर कधी संस्कृती वसवता येईल अशा गावाच्या शोधात आणि समृद्ध होत राहिली सर्वार्थांनी. एकीकडे जगण्याचा संघर्ष आणि दुसरीकडे त्यातून झालेल्या नवनव्या निर्मितीतील आनंद माणसाला उभारी देत राहिला आणि माणूस सादर करत राहिला आपणच निर्माण केलेलं एक नाट्य. असाच एक नाट्यप्रवास आपल्यासमोर घेऊन आले आहेत, सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी त्यांच्या अलीकडेच आलेल्या, ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...’ या पुस्तकातून. 

हे पुस्तक गोष्ट सांगतं, ‘दिग्दर्शक हे पद मिरवून घेण्यासाठी नसून ती एक सर्जनशील जबाबदारी आहे,’ असं मानणाऱ्या संवेदनशील दिग्दर्शकाच्या घडण्याची आणि त्यानं दिग्दर्शित केलेल्या नाटकांची! वयाच्या तिसऱ्या वर्षी हमदापूर ते औरंगाबाद आणि नंतर १९८८ मध्ये औरंगाबाद ते मुंबई अशी दोन स्थलांतरं  करणाऱ्या या दिग्दर्शकानं या पुस्तकात उभा केला आहे तो या स्थलांतरांमुळं केलेल्या संघर्षाचा आणि त्यातून मिळालेल्या समृद्ध अनुभवांचा प्रवास. गेली चाळीस वर्षे मुख्यत्वे वेगवेगळ्या नाटकांचा आशय समजून घेत, त्या-त्या शैलीनुसार दरवेळी वेगळं नाटक सादर करणाऱ्या, नाटकांच्या निवडीचे आणि नकारांचे निकष ठरवणाऱ्या या दिग्दर्शकाचा या पुस्तकात उभा राहिलेला साराच प्रवास विलक्षण आहे. ‘नाटक हे केवळ प्रचाराचं माध्यम नसतं, तर सर्वांगीण, समग्र नाट्यानुभव होण्यासाठी त्याला सादरीकरणाची ‘मिती’ असणं गरजेचं असतं, नाटक हे दृक्श्राव्य माध्यम आहे. नाटक सादर करणारे आणि बघणारे एका विशिष्ट कालमर्यादेच्या चौकटीत हा सलग दृश्यानुभव देत-घेत असतात. स्थळ-काळ-कृतीच्या निश्चित चौकटीत आणि रंगमंचीय अवकाशातच ही मांडणी ते प्रत्यक्ष अनुभवतात... नाटक उभारण्याच्या प्रक्रियेत त्याला हळूहळू रंगावृत्तीचा आकार येतो आणि मग अंतिमतः प्रयोगाच्या रूपानं त्याचं एका सजीव कलाकृतीत रूपांतर होतं’ असं मानणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी नामक दिग्दर्शकात  नाटक वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा वकूब असल्याचं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या नावांवर एक नजर टाकली तरी लक्षात येतं.

त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी औरंगाबादेत स्थापन केलेली ‘जिगिषा’ ही नाट्यचळवळ, त्यातील साथीदार,  प्रशांत दळवींसारखा त्यांच्यातील दिग्दर्शकाला ओळखणारा मित्र, अजित दळवींसारखा नाटकाविषयी गंभीरपणे बोलणारा-लिहिणारा माणूस, त्यांच्याबरोबरचं घट्ट नातं पुस्तकातून उलगडत जातं.  रंगमंचासमोरच्या काळोखात बसून स्वतःकडे आणि नाटकाकडे पाहणारे कुलकर्णी म्हणतात, ‘रंगमंचावरच्या त्या गूढ प्रकाशात आणि प्रेक्षागृहाच्या मिट्ट अंधारात, दोन तासांत नेमका काय ‘केमिकल लोच्या’ घडत असतो, माहीत नाही! पण करणाऱ्यांची, बघणाऱ्यांची अतीव एकाग्रता, उच्चारित शब्दांमधला ध्वनी, प्रकाश-संगीताचा मेळ यांतून काहीतरी प्रचंड वेगळं ‘घटित’ सगळेच अनुभवत असतात..’  

Web Title: The story is about the relentless journey of drama.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.