Join us

राज्य सरकार २ लाख लसी विकत घेणार, सार्वजनिक आरोग्य विभागाने खरेदीस दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 07:48 IST

Health News: गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांचा निदान होण्याचा आकडा वाढत असल्याने सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांचा निदान होण्याचा आकडा वाढत असल्याने सार्वजनिक आणि खासगी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. सर्व रुग्णालयात कोरोनाचा सामना करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे की, नाही हे तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात आले. औषधाचा साठा पुरेसा आहे की, नाही याची खातरजमा करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी अतिरिक्त  ( प्रिकॉशनरी ) डोसची मागणी केली जात होती; परंतु लसीचा साठा नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशा येत होती. दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने  २ लाख लस विकत घेण्यास मान्यता दिली आहे. 

लसीमुळे कोरोनापासून संरक्षण होते, हे वैद्यकीय पातळीवर सिद्ध झाले आहे. राज्यातील बहुतांश नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. मात्र कालांतराने नागरिकांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावा, असे सांगण्यात आले. त्यामध्ये काहींनी अतिरिक्त डोस घेतला. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रिकॉशनरी डोस घेतलेले नाहीत. त्यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांना प्रिकॉशनरी डोस घेण्याचे आवाहन केले होते.  कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाण्यास गर्दी केली होती. मात्र, बहुतांश लसीकरण केंद्रावर लस नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

किती खर्च येणार ?राज्यात सध्याच्या घडीला कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने वाढत असलेले रुग्ण याचा विचार करता, आवश्यक असलेल्या २ लाख लसींचे डोस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रती लस ३४१. २५ रुपये या दराने केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या भारत बायोटेक, हैदराबाद या उत्पादक कंपनीकडून अपवादात्मक परिस्थितीमध्ये खरेदी करण्यास विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी ६ कोटी ८२ लाख ५० हजार इतका खर्च केला जाणार आहे. 

मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिका राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे लसींची मागणी करत होत्या. मात्र, त्यावेळी राज्याकडेही लसीचा साठा उपलब्ध नव्हता. अखेर आरोग्य विभागाने लसीचे २ लाख डोस विकत घेण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात लसपुरवठा होईल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआरोग्य