दारुड्यांचा अड्डा! वरळीतील पाण्याच्या टाकीची सुरक्षा रामभरोसे; ६ सुरक्षारक्षक, पण ड्युटीवर दोघेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:22 IST2025-01-30T12:20:36+5:302025-01-30T12:22:29+5:30
दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वरळी येथील पाण्याच्या टाकीच्या परिसराची सुरक्षा रामभरोसे आहे.

दारुड्यांचा अड्डा! वरळीतील पाण्याच्या टाकीची सुरक्षा रामभरोसे; ६ सुरक्षारक्षक, पण ड्युटीवर दोघेच
सुरेश ठमके
दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वरळी येथील पाण्याच्या टाकीच्या परिसराची सुरक्षा रामभरोसे आहे. या परिसरात भरदिवसाही मद्यपी, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचा अड्डाच भरत आहेत. येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी असून तैनात असलेले सुरक्षा रक्षकही जागेवर दिसत नाहीत. त्यामुळे या टाकीची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वरळीतील बी.जी.खेर मार्गावरील टेकडीवर दोन पाण्याच्या टाक्या आहेत. मुंबईकरांच्या आरोग्याच्या व जीविताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या टाक्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर आहे. येथे तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक कागदावर असले तरी कर्तव्यावर मात्र प्रत्येकी दोघेच असतात. त्यापैकी एक सुरक्षारक्षक टाकीपासून ४०० मीटरवरील मुख्य द्वारावर असतो. टाकीकडे जाणाऱ्यांना हा सुरक्षारक्षक अडवताना दिसत नाही. तर दुसरा सुरक्षारक्षक नेमलेल्या जागेवर कित्येकदा हजर नसल्याचे कर्मचारी सांगतात. केवळ दोन सुरक्षारक्षक या मोठ्या परिसराचे रक्षण करू शकत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भरदुपारी मद्यपान
पाण्याच्या टाकीच्या परिसरात बाजूच्या झोपडपट्टीतील काही तरुण आणि नागरिक भरदुपारीही बिनधास्तपणे मद्यपान करत असतात. पत्ते खेळणारे आणि अमली पदार्थ घेणारे टोळकेही या परिसरात सतत वावरत असतात.
सुरक्षेसाठी भिंत बांधण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
१. अत्यंत संवेदनशील असलेल्या या परिसरात बाहेरील व्यक्ती प्रवेश करु नयेत, यासाठी संरक्षक भिंत गरजेची आहे. आम्ही सातत्याने याबाबत पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र झोपडपट्टीतील काही झोपड्या त्यासाठी हटवाव्या लागत असल्याने राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे काम रखडले आहे. या परिसरात सीसीटीव्ही सुद्धा सगळीकडे नाहीत, त्याचीही आम्ही मागणी केली आहे.
२. सीसीटीव्ही बसविले तरी ते फुटणार नाहीत याची खात्री नाही. बाहेरील नागरिकांचा येथे नेहमीच धुडगूस असतो. संरक्षक भिंत बांधणे हाच त्यावरचा एक उपाय आहे. झोपडपट्टीतील मुले क्रिकेट खेळायला येतात आणि नेहमी मालमत्तेचे नुकसान करुन जातात. अवैध कृत्य करणाऱ्यांना मज्जाव केल्यास त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या आहेत, असे वरळी जलाशय येथील पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
लाकडे गोळा करणारे नागरिक
शेजारच्या झोपडपट्टीतील मुलांनी येथे क्रिकेटचे मैदान केले आहे. तर इथल्या शांततेचा आणि झाडांच्या गारव्याचा फायदा प्रेमीयुगुल घेतना दिसतात. इतकेच काय टाकीच्या कंपाऊंडला लागून असलेल्या अचानक नगर या झोपडपट्टीतील नागरिक या परिसरात लाकडे गोळा करण्यासाठीही येतात. येथील पाण्याच्या टाकीचे व्हॉल्व्ह उघडे आहेत. तर काही ठिकाणी त्यावरील झाकणे नीट लागलेले नाहीत. अशा वेळेत जर कुणी काही पाण्यात मिसळण्याचा प्रयत्न केला तर ते मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.