Join us
Daily Top 2Weekly Top 5

जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:47 IST

महानगपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याचं दिसत होतं. त्यातच ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांचा संताप, एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ यामुळे राज्याच्या राजकारणातील आजचा दिवस गाजत असतानाच मुंबईतील दादर येथे वेगळंच चित्र दिसून आलं.

महानगपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याचं दिसत होतं. त्यातच ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांचा संताप, एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ यामुळे राज्याच्या राजकारणातील आजचा दिवस गाजत असतानाच मुंबईतील दादर येथे वेगळंच चित्र दिसून आलं. महायुतीच्या जागावाटपात दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ ची जागा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेला सुटल्याने येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या अक्षता तेंडुलकर यांची निराशा झाली. त्यांना शिंदेसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढण्याची ऑफर देण्यात आली. मात्र लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढायचे असे सांगत तेंडुलकर यांनी ही ऑफर नाकारली. एकीकडे उमेदवारीसाठी नेते झटक्यात निष्ठा आणि पक्ष बदलत असताना, अक्षता तेंडुलकर यांनी घेतलेल्या निर्णयाची एकच चर्चा होत आहे.

आपल्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षता तेंडुलकर म्हणाल्या की,  एकमेव खुल्या प्रवर्गातील असलेल्या प्रभाग क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होते. काल दुपारपर्यंत भाजपच्या नेत्यांनी हा प्रभाग भाजपला लढवण्यास मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या निर्णयानुसार हा प्रभाग शिवसेनेला मिळाला. एक स्ट्राँग उमेदवार म्हणून शिवसेनेकडून मला या प्रभागातून लढवण्यासाठी दुपारी ऑफर आली. त्यानुसार काही वरिष्ठांशी चर्चा करून या प्रयोगाविषयी चाचपणी करण्यात आली. याला अनुसरून काल आम्हाला सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आले होते. त्यानुसार आम्ही तिथे भेट दिली. शिवसेनेतून लढण्याच्या प्रक्रियेनुसार पक्षप्रवेश व AB फॉर्म वाटप, दोन्ही एकत्र होणार होते.

तिथे गेल्यावर काही काळ आमची चर्चा झाली आणि निर्णय घेण्यासाठी मी काही वेळ मागून घेतला. मी आणि माझ्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते घेऊन तिथून रात्री उशिरा आम्ही पुन्हा दादर कार्यालयात परतलो. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते असे ठरवले की वरिष्ठांची परवानगी असली तरी एका निवडणुकीसाठी मागील दहा वर्षांचे पक्षातील कार्य, हिंदुत्वासाठी सुरू असलेला लढा आणि भाजपा परिवार यांच्यापासून दूर व्हायचे नाही, लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढायचे. मात्र याबाबत मान्यता न मिळाल्याने मी सदर सीट न लढवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली. तसेच माझ्यावर दृढ विश्वास दाखवणारे एकनाथ शिंदे, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, तसेच मला साथ देणारे माझे सर्व सहकारी, माझ्यावर शुभेच्छा आणि आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार, अशा शब्दात तेंडुलकर यांनी सर्वांचे आभारही मानले.    

English
हिंदी सारांश
Web Title : BJP worker refuses Shinde Sena's offer to contest with 'bow and arrow'.

Web Summary : Akshata Tendulkar, a BJP worker, declined Shinde Sena's offer to contest Mumbai's election on 'bow and arrow' symbol after her seat went to Shinde's party. She insisted on contesting with BJP's 'lotus' symbol, upholding party loyalty.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६भाजपामुंबई महानगरपालिका