'ज्याला-त्याला स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार'; कायंदे यांच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 16:29 IST2023-06-18T16:25:00+5:302023-06-18T16:29:44+5:30
मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'ज्याला-त्याला स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार'; कायंदे यांच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचं मत
मुंबई: शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. मात्र त्याआधी ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहे. काल शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. आज विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मनीषा कायंदे ह्या गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आज सकाळपासून मनीषा कायंदे ह्या नॉट रिचेबल आहेत. मनीषा कायंदे ह्या आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनीषा कायंदे ह्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिबिराला अनुस्थितीत आहेत. त्यामुळे वर्धापनदिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला त्याला स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार आहे. आता ती प्रगती काही लोकांना आमदारकीची टर्म वाढवणं म्हणजे प्रगती आहे, असं वाटू शकतं, तर काही निष्ठावंतांना गड लढणे आणि स्वत:चा नावलौकिक वाढवणे म्हणजे प्रगती केल्यासारखं वाटू शकतं. तसेच आजची राजकीय परिस्थिती पाहता लोक वेगवेगळ्या पक्षात जातंय, याचा आमच्या पक्षावर काही परिणाम होईल, असं वाटत नाही, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मनीषा कायंदे यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक स्वार्थासाठी पक्षात येतात आणि स्वार्थासाठी निघून जातात. त्यांच्या निघून जाण्यानं शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. स्वार्थी लोकांना ओळखण्यात आमची चूक झाली आहे. गेल्या अनेक वर्षात ही चूक झाल्याचे मी वारंवार सांगितल्याचे संजय राऊतांनी सांगितले. तसेच यापुढे काळजी घेतली जाईल, असं स्पष्टीकरणही संजय राऊतांनी यावेळी दिलं.
कोण आहेत मनीषा कायंदे?
मनीषा कायंदे ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या आमदार आहेत. त्यांनी भाजपाकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या. त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती.