मंदीतच गुंतवणुकीची खरी संधी असते... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 09:49 IST2025-03-02T09:48:43+5:302025-03-02T09:49:28+5:30

शेअर बाजारात सध्या होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

the real investment opportunity lies in a recession in share market | मंदीतच गुंतवणुकीची खरी संधी असते... 

मंदीतच गुंतवणुकीची खरी संधी असते... 

विनायक  कुळकर्णी, गुंतवणूक सल्लागार

शेअर बाजारात सध्या होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. परदेशी गुंतवणूकदार संस्था रोज विक्री करीत आहेत. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यात यू-ट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील तथाकथित गुंतवणूक सल्लागार शेअरबाजार आणि म्युच्युअल फंड्सविषयी जे काही तारे तोडत असतात ते बघून आणि ऐकून गुंतवणूकदार अजूनच चिंतेत पडून अनामिक भयामुळे एक तर शेअर्सचा आणि म्युच्युअल फंड्सचा रोखेसंग्रह-पोर्टफोलियो विकून टाकत आहेत, तर काहीजण म्युच्युअल फंडांत सुरू असलेल्या एसआयपीच्या मासिक गुंतवणुका थांबवून त्या गुंतवणुकापण काढून घेण्याच्या मानसिकतेत आले आहेत.

जानेवारी २०१४ ते फेब्रुवारी २०२५ या चौदा वर्षांत परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ६.५७ लाख कोटी रुपयांची विक्री केलेली आहे, तर भारतीय गुंतवणूकदार संस्थांनी १४.७० लाख कोटी रुपयांची खरेदी याच अवधीत केली आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत सात वेळा दोन अंकी उत्पन्न दराने गुंतवणूकदारांना लाभ झाला आहे. तीन वेळा एक अंकी उत्पन्न दराचा लाभ झाला, तर फक्त एकाच वर्षी- ४.९८ टक्के दराने तोटा दर्शविला गेला आहे. 

कोविड-१९ मुळे २०२० मध्ये शेअरबाजार निर्देशांकांत ३८ टक्के घसरण झाली होती. याआधी २००८-०९मध्ये अमेरिकेतील सबप्राइम लेंडिंगमुळे बँका दिवाळखोरीत निघाल्या आणि जागतिक मंदी येऊन शेअरबाजार निर्देशांकात ६१ टक्के घसरण झाली होती. तसेच २०००-२००१ मध्ये डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटल्याने ५६ टक्के, तर १९९२-९३ मध्ये हर्षद मेहता घोटाळ्यामुळे ५४ टक्क्यांनी निर्देशांकांत घट झाली होती. एवढे सर्व घडूनही शेअरबाजार निर्देशांकाने प्रतिवर्ष सरासरी पंधरा टक्के परतावा दिला आही. या सर्व घसरणींच्या तुलनेत विद्यमान निर्देशांक घसरण १५ टक्क्यांहून कमीच आहे. कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल एकदमच निराशाजनक आले आहेत. ४४ टक्के कंपन्यांच्या उत्पन्नात आणि पर्यायाने नफ्यात मोठी घसरण झाली आहे. 

भारतीय कंपन्यांच्या कामगिरीची आणि देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न-जीडीपीच्या उड्डाणाची जी काही हवा निर्माण झाली होती ती हवेतच विरून गेल्याने बाजारात नैराश्य आले आणि त्याची परिणीती या घसरणीत झाली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात गेली पाच वर्षे करीत नव्हती, ती आता पाव टक्के कपात करून सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये अजून रेपो दरात अपेक्षित असलेली पाव टक्का  कपात झाली तर शेअर बाजार सावरायला एक महत्त्वाचे कारण मिळणार आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर  गुंतवणूकदारांनी मुळीच घाबरून न जाता म्युच्युअल फंडांतील एसआयपीतील गुंतवणुका सुरूच ठेवाव्यात. अशा मंदीच्या काळात एसआयपी सुरू ठेवल्याने योजनेतील युनिट्सची संख्या वाढत जाते. जेव्हा शेअरबाजार वर चढतो त्या युनिट्सचे मूल्यांकन वाढत जाते. हाच मंदीचा अवधी अधिकाधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळवून देत असतो. अर्थातच किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लक्षात घेत ही गुंतवणूक केली गेली तर ती अधिक लाभदायी ठरू शकते.
 

Web Title: the real investment opportunity lies in a recession in share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.