"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 20:32 IST2025-05-16T20:31:29+5:302025-05-16T20:32:19+5:30
'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या वतीने वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठं स्टेडियम उभारण्याचा मानस व्यक्त केला.

"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
Devendra fadnavis News: "खरंतर लोक पूर्वी असं म्हणायचे की, लॉडर्स ही क्रिकेटची पंढरी आहे. पण, खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि याचं अजून एक कारण आहे. पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याचा पुतळा या वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे. तिथे हा सोहळा होतोय. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे", अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वानखेडे स्टेडियममधील स्टॅण्डचे नामकरण शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक स्टेडियम उभे केले पाहिजे, अशी इच्छा एमसीएकडे व्यक्त केली. त्यासाठी लागणारी सर्व मदत सरकारकडून केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
१ लाख लोक बसतील असे स्टेडियम उभारू
"वानखेडे स्टेडियम पन्नास वर्ष आपण सेलिब्रेट केले आणि पुढची ५० वर्ष आयकॉनिक स्टेडियम राहील. पण, त्याचवेळी अजिंक्य नाईक आणि अमोल काळे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होत की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे; किमान १ लाख लोक बसू शकतील असं", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वाचा >>"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
"मी आजच याठिकाणी सांगतो की, अजिंक्यजी तुम्ही जर प्रस्ताव दिला, तर महाराष्ट्र शासनाच्यावतीने उचित जागा आम्ही तुम्हाला देऊ. एक अजून मोठं स्टेडियम... एक लाख लोक बसतील अशा प्रकारचे. कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेटप्रेमींचं एक राज्य आहे. मुंबईने क्रिकेटला जे दिलं आहे, ते सर्वांना माहिती आहे. म्हणून अजून एक स्टेडियम असणं आणि सर्व क्रिकेटप्रेमींना आपण जागा देऊ शकू असं स्टेडियम असलं पाहिजे, हे मला वाटतं महत्त्वाचं आहे", असेही देवेंद्र फडणवीस एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले.
"चार वर्षांनी एमसीएला शंभर वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे असा प्रयत्न केला पाहिजे की, जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील, तेव्हा अजून एक नवीन स्टेडियम आपण उभे करू शकलो पाहिजे. त्यादृष्टीने तुम्हाला जी काही मदत हवीये, ती मदत करण्याचा प्रयत्न करू", अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
तो क्षण देखील पाहण्यासारखा असेल -फडणवीस
'रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर जे मैदान दणाणून सोडतात. सगळ्या फॉर्ममॅटमध्ये जो खेळ आपल्याला दाखवला, तो सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट बघत आहोत की, कधीतरी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टॅण्डला जाऊन लागतो. तो क्षण देखील पाहण्यासारखा असेल", असे फडणवीस म्हणाले.