अंधेरीच्या राजाचे १८ तासांच्या मिरवणुकीनंतर वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:11 IST2025-09-11T19:11:41+5:302025-09-11T19:11:58+5:30

विशेष म्हणजे १९७४ पासून संकष्टीला विसर्जन होणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे.

The Raja of Andheri was immersed in the Vesava sea after an 18-hour procession. | अंधेरीच्या राजाचे १८ तासांच्या मिरवणुकीनंतर वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

अंधेरीच्या राजाचे १८ तासांच्या मिरवणुकीनंतर वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

- मनोहर कुंभेजकर

मुंबई-पश्चिम उपनगरातील मानाचा नवसाला पावणारा गणपती आणि विशेष म्हणजे १९७४ पासून संकष्टीला विसर्जन होणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे.अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती आयोजित या गणेशोत्सव मंडळाने यंदा ६० वा हिरक महोत्सव  गणेशोत्सव साजरा केला. यावर्षी मंडळाकडून गुजरात येथील सारंगपूर कष्टभंजन देव हनुमान मंदिराचा देखावा उभारला होता.या वर्षी लाखो गणेशभक्तांसह अनेक सेलिब्रेटीं अंधेरीच्या राजाचे आवर्जून दर्शन घेतले.

 काल सायंकाळी आरती झाल्यावर सजवलेल्या ट्रक वर आझाद नगर २ येथून अंधेरीच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आली. येथील आझाद नगर २ येथील अंधेरी राज्याच्या मंडपातून हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात काल सायंकाळी ६.३० च्या सुमारास वाजत-गाजत मिरवणूक निघाली.त्यानंतर आझाद नगर,अंबोली,अंधेरी मार्केट,एस.व्ही.रोड,जयप्रकाश रोड वरून राजकूमार,अपनाबाजार,चार बंगला,पिकनिक कॉटेज,मछलीमार,गंगाभवन मार्गे वेसावे समुद्रकिनारी पोहचली. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे जल्लोषात स्वागत केले.तर विविध ठिकाणी विद्युत रोषणाई केली तर अनेक ठिकाणी अंधेरीकरांनी अंधेरीच्या राजावर पुष्पवृष्टी केली.तर दिवाळीत आपला फटाके विक्रीचा धंदा जोऱ्यात व्हावा यासाठी अंधेरी मार्केटचे अल्पसंख्याक बांधव अंधेरीच्या राजाचे स्वागत केले.तर अनेक गणेशभक्तांनी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर काल आपला संकष्टीचा उपवास सोडला.आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदशक व पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे  व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी लोकमतला ही माहिती दिली.

येथील माजी नगरसेवक दिवंगत मोतीराम भावे यांच्या कुटुंबांनी आज अंधेरीच्या राजाची पूजा केल्यावर आज दुपारी १२.३० च्या सुमारास ढोल,ताशा,बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आताशबाजीत सुमारे १८ तासांच्या मिरवणुकी नंतर अंधेरीच्या राजाचे वेसावेच्या खोल समुद्रात विसर्जन झाले. यावेळी समुद्रकिनारी वेसावकरांनी व गणेश भक्तांनी  मोठी गर्दी केली होती. 

वेसावे गावातील मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष वीरेंद्र मासळी,उपाध्यक्ष अलंकार चाके,सेक्रेटरी उद्धव भनगवले, खजिनदार मितेश चाके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेसाव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे खास बोटीतून आज दुपारी १२.३० च्या सुमारास सुखरुप विसर्जन करून अंधेरीच्या राजाला निरोप दिला अशी माहिती समितीचे अध्यक्ष अशोक राणे व सचिव विजय सावंत यांनी दिली.

Web Title: The Raja of Andheri was immersed in the Vesava sea after an 18-hour procession.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.