Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका अन् उत्तरे परीक्षेपूर्वीच आली व्हॉट्सॲपवर; मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 05:58 IST

कॉलेज प्रशासनातर्फे विद्यापीठाकडे तक्रार; सिद्धार्थ कॉलेजमधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या (सत्र-५) परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार सिद्धार्थ कॉलेजमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. विद्यापीठाची हिवाळी सत्राची परीक्षा सुरू आहे.

फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिद्धार्थ कॉलेजमध्ये टी.वाय.बी.कॉम.ची (सत्र-५) परीक्षा सुरू आहे. ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास कॉमर्स-५ या विषयाचा पेपर होता. त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता. परीक्षा हॉलमध्ये माने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जबाबादारी पार पाडत असताना एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपमध्ये कॉमर्स-५ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसून आले. माने यांनी मोबाइल ताब्यात घेतला. प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक त्यांच्या परीक्षा केंद्राचा नसून, अन्य परीक्षा केंद्राचा असल्याचे स्पष्ट झाले. 

पैशांचे व्यवहार?

ही प्रश्नपत्रिका नेमकी कुणाकडून व कशी मिळाली? यामध्ये पैशांचे काही व्यवहार झाले आहेत का? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे?, याचाही पोलिस शोध घेत आहे.

कॉलेज प्रशासनातर्फे विद्यापीठाकडे तक्रार

आरोपी गिरगाव येथील भवन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला त्याचा मित्र व गुन्ह्यातील सहआरोपी सूरज याने सकाळी ९.३७ वाजता व्हॉट्सॲपद्वारे ही प्रश्नपत्रिका पाठविली होती. याबाबत तत्काळ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली. 

विद्यपीठाचे म्हणणे...

विद्यपीठाकडे तक्रार आली आहे. पण पेपर फुटलेला नाही. एकाच मुलाच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस तपासात अधिक माहिती पुढे येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठव्हॉट्सअ‍ॅपपरीक्षा