Join us

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वाधिक बनावट नोटा ५०० रुपयांच्या, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:02 IST

३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील घडामोडींची माहिती शिखर बँकेने या अहवालाद्वारे प्रसिद्ध केली आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरात बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून, सर्वाधिक बनावट नोटा या ५०० रुपयांच्या असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे पुढे आली आहे. 

विशेष म्हणजे ज्या बनावट नोटा पकडल्या जात आहेत किंवा रिझर्व्ह बँक अथवा अन्य बँकांच्या निदर्शनास येत आहेत, त्या नोटा या नव्या डिझाईनमधील आहेत. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील घडामोडींची माहिती शिखर बँकेने या अहवालाद्वारे प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार, प्रत्यक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्या बनावट नोटा जमा झाल्या त्यांचे प्रमाण त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत ६.९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. तर, अन्य बँकांत ज्या बनावट नोटा निदर्शनास आल्या त्यांचे प्रमाण तब्बल ९३.१ टक्के इतके आहे.

बनावट नोटांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ५०० रुपयांच्या (नव्या डिझाईन) नोटांचे आहे. हे प्रमाण तब्बल १०१ टक्के इतके आहे. तर, त्याखालोखाल दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट आहे. त्यांचे प्रमाण हे ५४.६ टक्के इतके आहे. एकीकडे दहा, वीस, २००, ५०० आणि दोन हजारांच्या बनावट नोटा वाढल्या असल्या तरी, ५० रुपये आणि १०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण मात्र सरलेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे २८.७ टक्के आणि १६.७ टक्क्यांनी कमी झाल्याची नोंद आहे.

एक हजार रुपयांच्या नोटांची छपाई सुरूच?

देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहीर करतेवेळी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ५०० रुपयांची नव्या डिझाईनमधील नोट बाजारात आली. मात्र, एक हजार रुपयांची नोट मात्र रद्दबातलच करण्यात आली. मात्र, या ताज्या अहवालात जी आकडेवारी रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केली आहे, त्यातील सदोष नोटांची आकडेवारी प्रसिद्ध करताना, त्यामध्ये एक हजार रुपयांच्या ११ सदोष नोटा छापल्याचा उल्लेख आहे. 

बनावट नोट मिळाल्यास काय करावे?

एखाद्या व्यवहारातून आपल्याकडे जर एखादी संशयास्पद नोट आली, तर सर्वप्रथम बँकेत जाऊन मशीनद्वारे त्याची सत्यता पडताळून पाहावी. नोट बनावट निघाल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार करावी.रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बँकेच्या निदर्शनास तुम्ही संबंधित नोट आणून दिल्यास त्याबदल्यात त्याच मूल्याचे पैसे तुम्हाला दिले जात नाहीत. बनावट नोट व्यवहारांत आणणे किंवा ती फिरवणे हा गुन्हा आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहाराष्ट्रबँक