लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलिस अंमलदारांनाही गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृहविभागाने दिले आहे. या निर्णयामुळे उपनिरीक्षक ते निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल.
मुंबई पोलिस दलात शिपाई, नाईक, हवालदार, सहायक फौजदार आदी अंमलदारांची संख्या ३५ ते ४० हजार, तर उपनिरीक्षक ते सहायक आयुक्तांपर्यंत अधिकारी पाच हजारांच्या आत आहे. बहुतांश पोलिस विविध बंदोबस्तात व्यस्त असतात. त्यात अंमलदारांचे जास्त मनुष्यबळ लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांवर तपासाचा ताण वाढतो.
पदवीधर असणे आवश्यक
पोलिस अंमलदाराला तपास अधिकारी म्हणून नियुक्त करताना तो पदवीधर असावा. तसेच सात वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात सहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील १७६(१) आणि १८०(१) नुसार पोलिस ठाण्याचा प्रमुख अनुक्रमे गुन्ह्याचा तपास आणि साक्षीदार किंवा गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींकडे थेट चौकशीसाठी हवालदार व त्यावरील अधिकाऱ्यांना किंवा पोलिस शिपायाची नियुक्ती करेल, असे गृहविभागाच्या आदेशात म्हटले आहे.