घराच्या प्रतीक्षेत पोलिस बाबाला गमावले, म्हाडा, मिल कामगारांच्या घरांभोवती दलालांची वाळवी; वकील, डॉक्टरसह शेकडो जण जाळ्यात
By मनीषा म्हात्रे | Updated: November 13, 2025 14:31 IST2025-11-13T14:31:07+5:302025-11-13T14:31:19+5:30
Mumbai Fraud News: आईला कॅन्सर. पोलिस बाबाने मुंबई पोलिस दलातून निवृत्तीच्या वाटेवर असताना, हक्काच्या घराचा शोध सुरू केला. घराच्या शोधात असताना या टोळीच्या जाळ्यात अडकले.

घराच्या प्रतीक्षेत पोलिस बाबाला गमावले, म्हाडा, मिल कामगारांच्या घरांभोवती दलालांची वाळवी; वकील, डॉक्टरसह शेकडो जण जाळ्यात
- मनीषा म्हात्रे
मुंबई - आईला कॅन्सर. पोलिस बाबाने मुंबई पोलिस दलातून निवृत्तीच्या वाटेवर असताना, हक्काच्या घराचा शोध सुरू केला. घराच्या शोधात असताना या टोळीच्या जाळ्यात अडकले. या टोळीने बॉम्बे डाइंग येथील म्हाडा मिल कामगारांच्या वसाहतीत स्वस्तात घर मिळवून देण्याचे स्वप्न दाखवले. वडिलांनी कुटुंबीयांना हक्काचे घर मिळावे म्हणून सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम घरासाठी गुंतवली. मात्र, पैसे भरूनही घराचा ताबा मिळाला नाही. यातच, आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ तणावात हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस रामनाथ घाडी यांनीही प्राण गमावले. त्यांचा मुलगा अंजिक्य घाडी हा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल कारण्यासाठी पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहे.
अजिंक्यसारखे अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न या टोळीमुळे भंगले आहे. आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यांत टोळीविरुद्ध गुन्हे नोंद असले, तरी ठग मंडळी सावजाच्या शोधात सक्रिय आहेत. या टोळीच्या जाळ्यात सर्वसामान्यांसह पोलिस, डॉक्टर, वकील, पालिका, सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने फसले असून, ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
घरे स्वस्त दारात मिळवून देण्याचे आमिष
मुंबईत म्हाडा, मिल कामगारांची हजारो घरे आहेत. याच इमारतींभोवती काही ठग मंडळी म्हाडामधून वाटप करण्यात येणाऱ्या घरांपैकी मृत व्यक्ती, वाटप न झालेले किंवा त्या घरावर म्हाडामध्ये दावा न केलेली घरे स्वस्त दारात मिळवून देण्याचे आमिष दाखवून सावजाला जाळ्यात ओढतात.
सरकारी दस्तावेज बनविण्यासाठी १५ लाखांपासून पैसे भरण्यास सांगतात. आधार कार्डपासून सर्व बनावट कागदपत्रे तयार करतात. त्या संबंधीचे ऑडिओ, व्हिडीओही तक्रारदारांनी पोलिसांना सादर केले आहेत.
आतापर्यंतच्या विविध पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यात घोडपदेव परिसरात राहणारा रूपेश सावंत याच्याविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे वडील निवृत्त पोलिस असून, त्यांच्याकडून देखील पैसे मागण्यासाठी दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. रूपेशविरुद्ध यापूर्वी भायखळा, वरळी, सायन, काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह विविध गुन्ह्यांत त्याला मदत करणारे अनिल मुळीकसह विविध दलालांविरुद्धही गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आयुष्यभराची जमापुंजी गमावली
अजिंक्यने दिलेल्या माहितीनुसार, वडील पोलिस दलात होते; निवृत्तीनंतर स्वतःचे घर असावे ही त्यांचीच इच्छा होती. पण कोविडच्या काळात घर घेण्याच्या नावाखाली एजंट अनिल मुळीक, पत्नी सुवर्णा मुळीक, ऋतुजा नार्वेकर आणि सुरेश कदम यांनी २२.५० लाखांची फसवणूक केली.
सेवानिवृत्तीचे सर्व पैसे गुंतवल्यानंतरही रूम न मिळाल्याने आधी आईचे निधन झाले. त्यानंतर वडील मानसिक ताणाखाली कोसळले आणि हृदयविकाराने निधन पावले. आरोपी सतत आश्वासने देत पळ काढत आहेत.
या टोळीने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले. गेल्या महिन्यातच रूपेश सावंत आणि मुळीकने भेट घेत पैसे देतो असे आश्वासन देत गुंडाळण्याचा प्रयत्न केला. काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
अधिकाऱ्यांना धरले हाताशी
काही प्रकरणांत मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे करून ती व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून फसवणूक करण्यात येत आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे. अधिकाऱ्यांकडूनच त्यांना या फाइल मिळत असून, याचाही सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे तक्रारदार आदेश मालवणकर यांनी सांगितले. आरोपी यंत्रणांना मॅनेज करून पळवाटा काढत नवीन सावजाच्या शोधात मोकाट फिरत आहे. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल
भायखळा, वरळी, दादर, सायन, अँटॉपहिल, काळाचाैकी पोलिस ठाण्यांसह विविध पोलिस ठाण्यांत या टोळीसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. तर काही ठिकाणी गुन्हे नोंदवून घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याने प्रकरणे दाबली जात असल्याचा आरोप तक्रारदार करत आहे.