Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 10:07 IST

शिवाने लीलावती रुग्णालय गाठले. तिथे त्याने रुग्णालयाबाहेर सिद्दिकी यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा घटनास्थळावरून पळाला. त्यानंतर हल्ला यशस्वी झाला की नाही, हे पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळ गाठून बघ्यांच्या गर्दीत तो उभा राहिला. तिथे पोलिसांनी त्याच्याकडे शूटर्सना पाहिले का, अशी विचारणाही केल्याचे आता चौकशीत समोर आले आहे.   

गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने शिवाच्या मुसक्या आवळल्या. शिवाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिवाने सिद्दीकी यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पुढे जाऊन बॅगेत आणलेले अतिरिक्त शर्ट बदलून पिस्तूल, शर्ट बॅगेत भरून ते हल्ला केल्याच्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या कारजवळ फेकून दिली. तेथून शिवाने लीलावती रुग्णालय गाठले. तिथे त्याने रुग्णालयाबाहेर सिद्दिकी यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. तेथून शिवा परत घटनास्थळी आला. तेथे पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरुमेल सिंग या दोन साथीदारांना पकडल्याचे त्याने पाहिले. तिथेच गर्दीत थांबून तो सगळ्या घडामोडींचा आढावा  घेत होता. 

पोलिस तिथे जमलेल्या गर्दीत प्रत्येकाकडे चौकशी करत होते. त्यात त्यांनी शिवालाही कोणाला पाहिले किंवा कसे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने कोणालाही पाहिले नसल्याचे सांगितले. घटनेच्या दोन दिवसांनी गुन्हे शाखेला शिवाने फेकलेली बॅग सापडली.  

असा काढला पळ घटनास्थळानंतर शिवा कुर्ल्याला आला. तेथून ठाणे मार्गे पुणे गाठले. शिवकुमारने दिलेल्या माहितीत, वाटेत फोन फेकून दिला. पुण्याहून झाशी आणि लखनऊमार्गे बहराईचला पोहोचला. प्रवासातील अनोळखी व्यक्तीचे फोन विचारून सहकाऱ्यांशी आणि हँडलर्सशी बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले. पुढे एका मित्रासोबत सुरू असलेल्या संवादातून तो आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईगुन्हेगारी