- अविनाश कुबल (पर्यावरण तज्ज्ञ)
मुंबई आसपासच्या समुद्री पाणथळी प्रदेशामध्ये कांदळवनांचे प्राबल्य आहे. कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या समुद्री पाणथळी परिसंस्थेच्या अन्नसाखळ्यांमध्ये सर्वोच्चस्थानी सोनेरी कोल्हा विराजमान आहे. म्हणजेच वनाच्छादित प्रदेशातील, कुरणांच्या परिसंस्थेच्या अन्नसाखळ्यांमध्ये जे स्थान वाघाचे आहे तेच स्थान कांदळवन प्रदेशातील अन्नसाखळीत सोनेरी कोल्ह्याचे आहे.
कुत्रे अथवा रान-कुत्रे तसेच लांडगे इत्यादी श्वान कुळातील प्राण्यांच्या गटातील सोनेरी कोल्हा या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी इंग्रजीमध्ये गोल्डन जॅकाल या नावाने ओळखला जातो. या प्राण्याचा संचार गवताळ प्रदेश, तुरळक जंगलांचा प्रदेश, चिखल आणि पाणथळ जागांचा प्रदेश, अशा विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये आढळतो.
जमिनीवर पडलेली उंबर किंवा टेंभुर्णीसारखी फळे, कासवांची तसेच जमिनीवर घरटे असलेल्या पक्ष्यांची अंडी, ओहोटीमुळे पाण्याच्या डबक्यांमध्ये अडकून पडलेले मासे, आणि बेडूक, खेकडे, यांच्यासारखे विविध प्रकारचे उभयचर, तसेच उंदीर, ससे, असे छोटे सस्तन प्राणी तसेच घोरपड, साप असे सरपटणारे प्राणी असा विविध प्रकारचा आहार हे या प्राण्यांचे खाद्य होय.
कांदळवन ही निसर्गातली एक अत्यंत समृद्ध अन्नउत्पादक परिसंस्था असल्यामुळे तेथे सोनेरी कोल्ह्याला आहाराची कमतरता आजिबात भासत नाही. उत्तम पोहणारा असल्यामुळे त्याला कांदळवना सारख्या परिसंस्थेमध्ये राहायला अजिबात अडचण येत नाही. सोनेरी कोल्हे पाण्यातून दूरवरचे अंतर सहजपणे पोहून जातात. हे अनुकूलन साधल्यामुळे कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हयांची संख्या वाढलेली आढळते.
श्वान कुळातील प्राणी असल्यामुळे मानवी वस्तीच्या आसपास आश्रयाला असलेल्या कुत्र्यांसोबत सोनेरी कोल्हे हे बहुधा सहनशील भूमिका घेतात. तसेच, जर वयात आलेल्या नर किंवा मादींची स्वत:च्या कळपात कमतरता असेल, तर अनेक वेळा त्यांचे शारीरिक संबंध सुद्धा अशा कुत्र्यांसोबत घडून येतात. प्रजनन काळाअंती मादा ३-४ पिल्लांना जन्म देते आणि आपल्या नखांनी जमिनीमध्ये खणलेल्या खड्ड्यामध्ये ठेवून त्यांचे संगोपन करते.
मुंबई आसपासच्या प्रदेशात सोनेरी कोल्ह्यांची संख्या अचानक वाढली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, तर त्याचे उत्तर असे आहे की कोरोना काळानंतर कांदळवनाच्या परिसरात मानवी संचार कमी होत असल्यामुळे त्या परिसंस्थेतील सोनेरी कोल्ह्यांसह सर्व प्रकारच्या प्राण्यांना मुक्त संचार संधी प्राप्त झाल्याणे त्यांची संख्या वाढत आहे. अर्थातच सोनेरी कोल्ह्यांची वाढती संख्या ही कांदळवन प्रदेशातील जैवविविधता योग्य प्रकारे संवर्धित होत असल्याचे द्योतक आहे.