मुंबई : राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी परिवहन विभागाने ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत याला मंजुरी दिली. पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी १०.२७ रुपये भाडे निश्चित केले आहे. जुलै महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नियम लागू असणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. तसेच उबर, रॅपिडो आणि ओला या तीन कॅबसेवा देणाऱ्या कंपन्यांना तात्पुरते परवाने देण्यात आल्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सांगितले.
राज्य सरकारने एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यास एप्रिल महिन्यात मान्यता दिली होती. या सेवेला परिवहन विभागाकडून आता मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी उबर इंडिया सिस्टीम प्रा.लि., मे. रोपेन ट्रान्सपोर्टशन सर्व्हिसेस प्रा.लि. आणि मे. एएनआय टेक्नोलॉजीज प्रा.लि. या संस्थांना ३० दिवसांसाठी तात्पुरते परवाने देण्यात आले आहेत. हे परवाने मुंबई महानगर क्षेत्राकरिता असणार आहे.
तिन्ही कंपन्यांना ३० दिवसाच्या आत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्के परवाने प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिहवन प्राधिकरणासमोर अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी ॲग्रिगेटर्सकडे किमान ५० ई-बाइक असणे आवश्यक असणार आहे.
काय आहे नियमावली?
केवळ इलेक्ट्रिक बाईकलाच परवानगी
केवळ १२ वर्षांवरील प्रवाशालाच बाइक टॅक्सीने प्रवासाची मुभा
महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष. बाइक टॅक्सींमध्ये चालक आणि प्रवाशामध्ये विभाजक बंधनकारक.
पावसाळ्यात सुरक्षा कवच आवश्यक.
प्रत्येक ट्रिपसाठी कमाल अंतर १५ किलोमीटरपर्यंत.
मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे सेवा, प्रवाशांची माहिती गोपनीय.
जास्तीत जास्त किती राइड्स?
बाइक-पूलिंग सिस्टमअंतर्गत
इ- दुचाकी चालविण्यासही परवानगी देण्यात आली आहे. रायडर्स शहराच्या हद्दीत दररोज जास्तीत जास्त चार व शहराबाहेर दोन राइड्स देऊ शकतात. तथापि, अशा पुलिंगदरम्यान ॲग्रिगेटर्सकडून कमिशन आकारले जाऊ शकणार नाही.
चालकांसाठी नियम
वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रान्स्पोर्ट बॅज आवश्यक, चालकांसाठी पात्र वय : किमान २० आणि कमाल ५० वर्षे, कामाचे तास : जास्तीत जास्त आठ तास