Join us
Daily Top 2Weekly Top 5

Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:26 IST

देशासाठी ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरेल : देवेंद्र फडणवीस; प्रत्यक्षात भुयारीकरण २० डिसेंबरपासून, ३६ महिन्यांत काम पूर्ण

मुंबई : भाऊचा धक्का ते मरीन ड्राईव्हपर्यंत जवळपास ५ किलोमीटरचे अंतर, जमिनीवर कोणालाही अडचण निर्माण न करता पूर्ण करण्याचे एमएमआरडीएने ठरवले आहे. १६ मजली उंच इमारत साधारण ५२ मीटर असते. तेवढ्या खोल जमिनीतून आणि भाऊचा धक्का ते ऑरेंज गेट या भागातील जमिनीवरच्या ७०० इमारतींच्याही खालून एक प्रचंड मोठा बोगदा करण्याच्या कामाचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मेट्रो तीन ज्या भागातून गेली आहे, त्याच्याही खाली जाऊन हे काम केले जाणार आहे. 

पूर्व मुक्त मार्गाला कोस्टल रोडशी जोडणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग हा महत्त्वाचा अर्बन प्रकल्प असणार आहे. हा प्रकल्प एका अर्थाने ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. 

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा असा हा प्रकल्प आहे. 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. अमीन पटेल, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, अश्विन मुद्गल, एमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल, सह महानगर आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय आदींची उपस्थिती होती.

मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.इंधनाची बचत, ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल.

पूर्व मुक्त मार्गामुळे वाहनांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत २० ते २५ मिनिटांत पोहोचता येते. मात्र, पुढील प्रवासासाठी मोठ्या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. पश्चिम, दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. त्यावर हा तोडगा आहे. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लाय ओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक पर्याय होता. हा बोगदा ७०० प्रॉपर्टीजच्या खालून आणि शंभर वर्षे जुन्या हेरिटेज इमारती असलेल्या भागातून जाणार आहे. पश्चिम, मध्य रेल्वेसह मेट्रो ३च्या गिरगाव, ग्रँट रोड स्थानकाच्या मधून ५२ मीटर खाली बोगदा खोदला जाईल.

अत्याधुनिक स्लरी शिल्ड टनेल बोरिंग मशीनचा वापर करून भारतातील सर्वात जटिल भूमिगत अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. -डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त्त, एमएमआरडीए

English
हिंदी सारांश
Web Title : Orange Gate Tunnel: Deepest Underpass Project to Ease Mumbai Traffic

Web Summary : Mumbai's Orange Gate Tunnel project, deeper than a 16-story building, launched to connect the Eastern Freeway to Marine Drive. This underground route will bypass 700 buildings, easing traffic and cutting travel time to the new Navi Mumbai airport. It's hailed as an engineering marvel.
टॅग्स :एमएमआरडीएदेवेंद्र फडणवीसमुंबई