मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला महापालिका मात्र पैसे देईना

By रतींद्र नाईक | Updated: August 17, 2023 12:43 IST2023-08-17T12:42:30+5:302023-08-17T12:43:35+5:30

प्रमोद महाजन उद्यानाचे सुशोभीकरणही रखडलेले

the municipal corporation did not pay for the chief minister dream project | मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला महापालिका मात्र पैसे देईना

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला महापालिका मात्र पैसे देईना

रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई सुशोभीकरण योजनेला खीळ बसली आहे. प्रत्येक प्रभागासाठी दिलेला ३० कोटींचा निधी अपुरा पडत असून हाती घेतलेली अनेक कामे त्यामुळे खोळंबली आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन उद्यानाचाही या खोळंबलेल्या कामांमध्ये समावेश आहे. 

मोठा गाजावाजा करीत मुंबई महापालिकेने गेल्यावर्षी सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. पदपथ दुरुस्ती, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विद्युत रोषणाई, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण आणि इतर कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येक प्रभागाला ३० कोटी रुपये देण्यात आले. हा निधी खर्ची पडला असून उर्वरित कामांसाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाला नाही तर मुंबईतील सुशोभीकरणाची कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. 

गतवर्षी राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबईच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार बऱ्याच ठिकाणी विद्युत रोषणाईसह अनेक कामे सुरू झाली. काही ठिकाणी चौकातील रस्ते दुभाजक, पदपथ येथे चकचकीत टाइल्स लावण्यात आल्या.  पालिकेने कंत्राटदार नेमून रंगरंगोटी, विद्युत रोषणाई व इतर प्रकल्पांवर खर्च केला. या कामांवर टीकाही झाली. रस्ते आणि चौकांतील रंगीबेरंगी झगमगाट पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर हा काय डान्स बार आहे का? असा सवाल केला होता.

पण सुशोभीकरणासाठी देण्यात आलेला निधी आता संपला असल्याचे सांगितले जाते. निधीअभावी बरीच कामे थांबली असून त्यामध्ये दादर, माहिम परिसरातील कामांचाही समावेश आहे. शिवसेनेसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. दिलेल्या निधीत कामे पूर्ण करा, अशा सूचना होत्या की नाही याबाबत तपशील मिळाला नाही. प्रभागांकडून पालिका मुख्यालयाकडे निधीची मागणी नोंदविण्यास सुरुवात झाल्याचे समजते.

१,१९६ पैकी ९५१ कामे पूर्ण

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत आजवर एकूण १,१९६ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्या पैकी ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील २८९, तर उपनगरांमधील ६६२ कामांचा समावेश आहे. सुशोभीकरण प्रकल्पावर आजपर्यंत ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

दादर, माहीममधील रखडलेली कामे

- दादर, माहीममधील विविध विकासकामे सुशोभीकरणाअंतर्गत केली जाणार असून त्यासाठी सुमारे ६ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. 

- माहीम रेती बंदर येथील उद्यान, प्रमोद महाजन उद्यान, अब्दुल हमीद उद्यान, वीर अभिमन्यू उद्यान, गणेश द्वार, व्ह्यूविंग डेक आणि चैत्यभूमी या ठिकाणी विविध सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. 

- मात्र, निधीअभावी ही कामे रखडली आहेत.

...तर आयुक्तांची मर्जी हवी

- सुशोभीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त निधी हवा असेल तर त्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मंजुरी आवश्यक आहे. 

- आयुक्तांची मर्जी अथवा मान्यता नसेल तर निधी मिळणे अशक्य असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

निधी आणखी लागणार असेल तर सहायक आयुक्तांनी पालिका प्रशासनाला कळवावे त्यांनी कोणत्या कामासाठी निधी लागणार आहे त्याबाबतची माहिती सादरीकरणद्वारे आयुक्तांना कळवावी वॉर्ड अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना यापूर्वीच देण्यात आली आहे. - संजोग कबरे, पालिका उपायुक्त, विशेष.

 

Web Title: the municipal corporation did not pay for the chief minister dream project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.