मुंबई : सण-वार, व्रतवैकल्यांचा महिना असलेल्या श्रावणाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने शहर आणि उपनगरातील धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहेत. शिवमंदिरांसह अन्य मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, त्याच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे.
गेल्यावर्षी श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाली होती. तसेच पाच श्रावणी सोमवार आले होते. त्यामुळे या महिन्याला वेगळे महत्त्व होते. यंदा काही वर्षांनंतर श्रावण हा इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलैमध्ये आला आहे. यंदाच्या महिन्यात चार सोमवार आले आहेत.
पूजा साहित्यांची दुकाने सजली
पूजेसाठी विविध प्रकारची फुले, बेलपत्र, दुर्वा, नारळ त्याचबरोबर हळदी-कुंकू, कापूर, अगरबत्ती व अन्य साहित्यांची आवर्जून खरेदी केली जाते. दुकानदारांनी अशी साहित्य विक्रीस ठेवली आहेत. शिवमंदिर परिसरातील दुकानांमध्ये शिवपूजेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याला मोठी मागणी असते. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि गोकुळाष्टमी या प्रमुख सणांचा समावेश आहे.
श्रावणी सोमवार व शिवमूठ परंपरा
श्रावणी सोमवारी शंकराची उपासना करण्यासोबतच ‘शिवमूठ’ अर्पण करण्याची परंपरा आहे. दर सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवमूठ अर्पण केली जाते.
कोणत्या सोमवारी कोणते धान्य अर्पण करणार?
पहिला सोमवार २८ जुलै- तांदूळ
दुसरा सोमवार ४ ऑगस्ट- तीळ
तिसरा सोमवार ११ ऑगस्ट- मूग
चौथा सोमवार १८ ऑगस्ट- जवस
दर्शनासाठी या मंदिरांत गर्दी
श्रावणात प्रत्येक सोमवारी मुंबईतील वाळकेश्वर मंदिर, बाबुलनाथ मंदिर, ठाण्यातील कौपिनेश्वर, अंबरनाथ येथील पुरातन मंदिरांत भाविक शंकराच्या दर्शनासाठी गर्दी करतात. याशिवाय अनेक मंदिरांमध्ये होमहवन केले जाते.
...अशी करतात विविध व्रतवैकल्ये
श्रावणीतील प्रत्येक सोमवार शंकराचे पूजन केले जाते. अनेकजण उपवास करतात. प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी साजरी केली जाते. नवविवाहिता हे व्रत करतात.श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीच्या सणानिमित्त नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. शुक्रवारी लक्ष्मी पूजन, तसेच देवीची पूजा, व्रत केले जाते. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरा होते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधते.