'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 06:00 IST2025-08-21T05:59:58+5:302025-08-21T06:00:29+5:30

सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे

The 'monorail' has no emergency rescue system; it only has the ability to tow the train to the station! | 'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोनो मार्गिकेवर गाडी बंद पडून आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रवाशांच्या सुटकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मंगळवारच्या मोनो रेल दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे. ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारितील महामुंबई मेट्रो संचलन मंडळाची क्षमता केवळ गाडी ओढून स्थानकात नेण्याएवढीच आहे. मात्र, गाडी ओढून नेणे शक्य नसल्यास प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत दुसरा पर्याय नसल्याचे वास्तवही उघड झाले आहे. यावरून ‘एमएमआरडीए’वर टीकेचा भडिमार केला जात आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणीही केली जात आहे.

मोनो मार्गावर मंगळवारी दोन गाड्या बंद पडल्या होत्या. यातील एक गाडी ‘एमएमआरडीए’ने अन्य गाडीच्या साहाय्याने ओढून वडाळा स्थानकात नेली. तेथून प्रवाशांची सुटका करण्यात आली. मात्र, दुसऱ्या गाडीचे ब्रेक खुले न झाल्याने ती एकाच जागी थांबून राहिली. ही गाडी स्थानकात आणणे शक्य नसल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने गाडीच्या खिडकीच्या काचा फोडून ५८२ प्रवाशांची सुटका करावी लागली होती. प्रवाशांच्या सुटकेचा हा थरार जवळपास दीड तास सुरू होता. यापूर्वीही प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली होती. मात्र, त्यातून ‘एमएमआरडीए’ने धडा घेतलेला नाही.

वाहतूकतज्ज्ञ काय म्हणतात?

आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची तत्काळ सुटका करण्याबाबत मोनो रेल्वे सुरू होण्याआधीपासून चर्चा सुरू आहे. बंद पडलेल्या गाडीच्या शेजारी दुसरी गाडी आणून या दोन गाड्यांचे दरवाजे उघडून त्यामध्ये पूल तयार करावा आणि दुसऱ्या गाडीत प्रवाशांना हलवून सुरक्षित ठिकाणी न्यावे, या उपाययोजनेवरही चर्चा झाली होती. मात्र, इतक्या वर्षांत कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी खंत वाहतूक तज्ज्ञ आणि सिव्हिल इंजिनिअर सुधीर बदामी यांनी व्यक्त केली.

काही घटनांमध्ये तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असते. दुर्घटनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘एमएमआरडीए’ने केवळ अग्निशमन विभागावर विसंबून राहू नये. स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. 

पांढरा हत्ती ठरलेली मोनो चालवायची म्हणून ‘एमएमआरडीए’ने चालवू नये. यातून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ होईळ. ‘एमएमआरडीए’ने तज्ज्ञांची समिती नेमून या घटनांना कशा रीतीने हाताळता येईल, याचा अभ्यास करावा. समितीच्या अहवालावरच मोनो संचलनाचा निर्णय घ्यावा, असे मत वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेणॉय यांनी मांडले.

‘त्या’ प्रश्नावर अधिकारी निरुत्तर

अशा प्रकारच्या घटना-दुर्घटना घडल्यास सर्व यंत्रणा एकत्र येऊन बचावकार्य करतात. मात्र, महामुंबई मेट्रोकडे स्वत:ची बचाव यंत्रणा का नाही, याचे उत्तर देणे मात्र अधिकाऱ्यांनी शिताफीने टाळले.

Web Title: The 'monorail' has no emergency rescue system; it only has the ability to tow the train to the station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.