Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार;  धारावी बचाव आंदोलनाचा सरकारा स्पष्ट इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 19:45 IST

धारावी बचाव आंदोलन तर्फे धारावी ते अदानी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात येत आहे.

श्रीकांत जाधव 

मुंबईअदानीविरोधात धारावी बचाव आंदोलन काढत असलेल्या मोर्चाची सरकारने धास्ती घेतली आहे. त्यामुळेच धारावीत लावलेले मोर्चाचे बॅनर्स मुदाम काढले जात आहेत. आमच्या सभांवर पाळत ठेवली जात आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही आम्हाला मुदाम मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही. अशा प्रकारे कितीही अडथळे आणले, परवानगी दिली नाही. तरी अदानी विरोधातील मोर्चा आम्ही काढणारच, असा स्पष्ट इशारा धारावी बचाव आंदोलनाने राज्य सरकारला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. 

धारावी बचाव आंदोलन तर्फे धारावी ते अदानी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲड. राजेंद्र कोरडे, माजी आमदार बाबुराव माने, विठ्ठल पवार, उल्लेश गजाकोश, संदीप कटके, श्यामलाल जयस्वार, संजय भालेराव, शैलेंद्र कांबळे, मिलिंद रानडे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. 

प्रकल्पाच्या एकत्रित भूखंडावर सरसकट ४ चटई क्षेत्र निर्देशांक देणे, महाराष्ट्र नेचर पार्कची ४० एकर जागा पुनर्विकास प्रकल्पाचा हिस्सा बनवने, टीडीआर मुंबईत कोठेही वापरण्यास मंजुरी देणे, ८० टक्के अधिकार अदानीला देणे अशा अनेक शुल्कमाफीतून अदानी रिएल्टीवर शासनाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.  अशा अदानी रिएल्टी चा बांधकाम क्षेत्रातील काहीही लौकिक नाही. भांडवली बाजारातील अदानीची पत ढासळली असून दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. अशा अदानीकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल याची धारावीकरांना खात्री नाही. अदानी पुनर्विकासाचे काम अर्धवट सोडून देईल, अशी भीती धारावी जनतेच्या मनात असल्यामुळे अदानी हटाव, धारावी बचाव अशी भूमिका आंम्ही घेतली आहे. मॅच फिक्सिंग पध्दतीने टेंडर प्रक्रिया राबवून, अदानी रिएल्टीला मंजूर केलेली निविदा रद्द करावी, म्हाडाचे माध्यमातून शासनाने हा प्रकल्प राबवावा तसेच म्हाडाचे माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवितेसमयी स्थानिक जनतेच्या खालील न्याध्य मागण्यांचा समावेश करावा, अशा आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे धारावी बचाव आंदोलनाचे समन्व्यक ॲड. कोरडे यांनी सांगितले.

टॅग्स :धारावीमुंबईउद्धव ठाकरे