Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर प्रकरणी तातडीने दखल घेऊन निवेदन सादर करावे; विधानसभा अध्यक्षांचे सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:59 IST

विधानसभा सभागृहात तीन स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

Vidhan Sabha News: संगमनेर तालुक्यात सहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर मंगळवारी साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात इसमाने ॲसिडसदृश ज्वलनशील पदार्थ फेकला. यात मुलीचा चेहरा व हात गंभीर भाजला आहे. हल्लेखोर फरार झाला आहे. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोरदार किंचाळली. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात हलविले. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. या घटनेच्या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. 

राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली.

संगमनेरमधील ज्या चिमुरडीवर हल्ला झाला ती गंभीर आहे. इतकी मोठी घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा? आरोपींना पळून जाण्याची हिंमत मिळतेच कशी? हे गृहखात्याचे आणि स्थानिक पोलिसांचे अपयश आहे! संबंधित पोलीस अधीक्षक हे गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ते रायगडमध्ये असतानाचे त्यांचे 'कर्तृत्व' सर्वांना माहिती आहे. जेव्हा रक्षकच भ्रष्ट होतात, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते आणि अशा क्रूर घटना घडतात, या शब्दांत वडेट्टीवारांनी टीका केली. 

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी या घटनेची दखल घेतली. दिलेली माहिती अत्यंत गंभीर असून शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन सभागृहात सविस्तर निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. विधानसभा सभागृहात तीन स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sangamner Acid Attack: Assembly Speaker Orders Report from Government

Web Summary : Following the shocking acid attack on a young girl in Sangamner, the Assembly Speaker has directed the government to submit a detailed report. Congress leader Vijay Wadettiwar raised concerns about the incident and police efficiency, demanding immediate discussion and questioning how the accused remains at large. The Speaker acknowledged the gravity of the situation.
टॅग्स :विधानसभाविधान भवनकाँग्रेसविजय वडेट्टीवारअहिल्यानगर