घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही; RSS नेत्याचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:39 IST2025-03-06T08:29:55+5:302025-03-06T10:39:03+5:30

RSS Bhaiyyaji Joshi Controversial Statement on Marathi: माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे मुंबईत नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

The language of Ghatkopar is Gujarati, it is not necessary to be able to speak Marathi in Mumbai; RSS leader Bhaiyyaji Joshi sensational statement | घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही; RSS नेत्याचं खळबळजनक विधान

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही; RSS नेत्याचं खळबळजनक विधान

मुंबई - सध्या देशातील दक्षिणेकडील राज्यात हिंदी भाषा लादण्यावरून वादंग उठलं आहे. तामिळनाडूत मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी तामिळ भाषेसोबत हिंदी भाषेचा पर्याय देण्याला कडाडून विरोध केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात RSS चे ज्येष्ठ नेते आणि माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषेबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलं पाहिजे असं नाही असं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले आहे. 

घाटकोपरच्या एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. प्रत्येक भागाची भाषा वेगवेगळी असली तरी घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्याला मराठी आलेच पाहिजे असं काही नाही असं त्यांनी म्हटलं आहे. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी घाटकोपर भागात मराठी आणि गुजराती हा वाद उफाळून आला होता. घाटकोपर भागातील गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यापासून रोखल्याचा आरोप झाला होता. 


मुंबईत गेल्या काही काळात मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना डावलण्याचे प्रकार समोर आलेत. अंधेरीतील एका कंपनीने नोकरीची जाहिरात देताना मराठी माणसाला नोकरी नाही असं प्रसिद्ध केले होते, त्यावरून वाद झाला. गिरगावातही हाच प्रकार घडला होता. मुलुंडमध्ये एका सोसायटीने मराठी महिलेला घर नाकारले होते. कल्याणमध्ये शासकीय सेवेत काम करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केली होती. त्यामुळे मुंबई परिसरात मराठी माणसांविरोधातील या प्रकारावर मनसे, शिवसेनासारख्या राजकीय पक्षांनी आवाजही उचलला होता. त्यात आता भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाने मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं फटकारलं

मुंबईत राहायचं, इथून कमवायचं, मोठं व्हायचं, पण इथल्या माणसाशी दोन शब्द मराठीत बोलायला लाज वाटते? मग लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीचा स्वभाव मऊ असला तरी वेळ आल्यावर तो दगड होतो आणि कुणाच्या डोक्यात फोडायचा, हे आम्ही ठरवतो. सहिष्णुतेच्या नावाखाली मराठी माणसाला गिळायला तुम्ही शिकला असाल, पण अजून आम्ही गप्प बसलेलो नाही. भैय्याजी जोशींचं विधान मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या भूमीत घुसला असाल, तर इथल्या मातीत मिसळलंच पाहिजे! नाहीतर महाराष्ट्र कधी काय करेल हे सांगता येणार नाही! आमची शांतता ही आमची कमजोरी समजू नका अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी जोशींना फटकारलं आहे. 
 

Web Title: The language of Ghatkopar is Gujarati, it is not necessary to be able to speak Marathi in Mumbai; RSS leader Bhaiyyaji Joshi sensational statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.