फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 05:15 IST2025-12-15T05:13:33+5:302025-12-15T05:15:00+5:30
मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जयघोषाने दणाणले

फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेहमी क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघांच्या जयघोषाने दणाणून जाणारे मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटूलिओनेल मेस्सीच्या जयघोषाने दणाणले. मेस्सीच्या भारत भेटीच्या दौऱ्यातील मुंबई सत्रात सुमारे ३०हजार हून अधिक फुटबॉलप्रेमींनी मेस्सीला प्रत्यक्षात पाहिले. यावेळी, लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल या स्टार फुटबॉलपटूंचीही उपस्थिती होती.
मेस्सीचे सायंकाळी ५.५१ वाजता वानखेडेवर आगमन झाले. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मेस्सीसह प्रोजेक्ट महादेवाचे अनावरणही केले.
१० क्रमांकाची जादू
मेस्सीच्या या शानदार भेटीदरम्यान क्रीडाविश्वाने दहा क्रमांकाची जादू अनुभवली. क्रिकेटविश्वाचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉल विश्वाचा जादूगार मेस्सी यांची जेव्हा भेट झाली, तेव्हा क्रीडाविश्वातील दहा क्रमांकाची जादू दिसून आली.
या दोन्ही दिग्गजांच्या जर्सीचा क्रमांक १० आहे. यावेळी, चाहत्यांनी 'सचिन... सचिन' जयघोष केला. यावेळी, सचिनने २०११ सालच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची स्वतःची जर्सी मेस्सीला भेट दिली, तर मेस्सीने सचिनला फुटबॉल भेट दिला.
"वानखेडे स्टेडियमवर तीन स्टार फुटबॉलपटूंना येथे पाहणे हा मुंबई, मुंबईकर व भारतासाठी सुवर्णक्षण आहे. लिओ दिग्गज आहेच. महत्त्वाचे म्हणजे त्याने साधेपणामुळे सर्वाधिक प्रेम कमावले." - सचिन तेंडुलकर
नवोदित मुलांना शिष्यवृत्ती
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या प्रोजेक्ट महादेवा या १३ वर्षांखालील खेळाडूंच्या उपक्रमातील ३० मुले आणि ३० मुलींना मेस्सी, सुआरेज आणि रॉड्रिगो यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या दिग्गजांनी यावेळी, काही मिनिटे या नवोदितांसह फुटबॉल खेळण्याचा आनंदही लुटला. एका मुलीने स्ट्रायकर सुआरेजला चकवताना त्याच्या पायाच्या मधून शिताफिने चेंडू पुढे नेला. हे पाहून सुआरेजही स्तब्ध झाला.
मान्यवरांची उपस्थिती: मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) अध्यक्ष प्रफुल पटेल, दिग्गज भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता अजय देवगण, अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेता डिनो मोरियो यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेस्सीसह सुआरेझ आणि रॉड्रिगो या तिन्ही फुटबॉलपटूंचे आभार मानले.