मुंबई : ईडीच्या माध्यमातून देशातील विरोधकांना उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सतत होत आहेत. पीएमएलए कायद्यात बदल करण्याची गरज असून, देशात परिवर्तन झाल्यावर हे काम प्राधान्याने केले जाईल. न्यायव्यवस्थेने या घटनांकडे गंभीरपणे पाहायला हवे. ईडीला मिळालेल्या शक्तीमुळे ईच्छा असूनही न्यायव्यवस्थेवर मर्यादा येत आहे, असे परखड मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. तर, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पीएमएलए लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला असेल तर तो अधिकार राज्याच्या सरकारला दिला पाहिजे. कुणाला काही व्हायचे म्हणून नाही तर स्वर्गासारखा देश ज्यांनी नरक केला त्यांना घालवण्यासाठी लढावेच लागणार आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रवींद्र नाट्य मंदिरात शनिवारी उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातील स्वर्ग पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ठाकरे व पवार यांनी सरकारवर टीका केली. विशेष अतिथी म्हणून तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे व्यासपीठावर उपस्थित होते. खा. सुप्रिया सुळे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, आ. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.आयुष्यात अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, तर काही संधीसाधू संधी मिळाल्यावर पळून जातात. शिवसेनाप्रमुखांनी जे काही दिले त्यातील कोणी काय घेतले याची ते परीक्षा घेत आहेत. शंभर दिवस शेळ्यांसारखे जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जगा. दुसऱ्याला आनंद देऊ शकलो नाही तर त्रास तरी देऊ नये इतके जरी माणसाने पाळले, तरी आपण आयुष्य जगलो असे वाटते. पण, सध्या जे बघतोय त्याला लोकशाही मानायची की हुकूमशाही हा प्रश्न आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.राऊत यांच्या अटकेमागे पत्राचाळ प्रकरण हे फक्त निमित्त होते. मुंबई, महाराष्ट्रात काही लोक चुकीचे करतात. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांनी देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिले. शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवून अशा लोकांमार्फत कसे पैसे गोळा केले जातात याची माहिती त्यांनी दिली. पण, त्याचा परिणाम म्हणजे दोषींवर कारवाई न होता राऊत यांना अटक झाली. त्यामुळे त्यांना १०० दिवस तुरुंगवास भोगावा लागला, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.ईडीने पंगा घेतलेला मी शेवटचा माणूस आहे. यापुढे ईडी आपल्या दारात येणार नाही. ज्यांनी आम्हाला पकडले त्यांना आता पश्चाताप होत आहे. पुस्तकात जे लिहिले आहे ते सत्य असून, त्यात रडगाणे नाही. कारवाईला सामोरे गेलो, पण जुलमी शासन व्यवस्थेच्या साम्राज्यासमोर झुकलो नाही, असे खा. संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
पाकिस्तानऐवजी नरक पसंत करेनदोन्ही बाजूचे कट्टरपंथीय मला शिव्या घालतात. एका बाजूचे म्हणतात, तू काफीर आहेस नरकात जाशील. तर दुसऱ्या बाजूचे म्हणतात, जिहादी तू पाकिस्तानला निघून जा. आता माझ्याकडे पाकिस्तान व नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकातच जाणे पसंत करेन. मागच्या ३० वर्षांत मला चार वेळा पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यांमुळे संरक्षण दिले गेले. राऊतांचा स्वभाव आयपीएल खेळाडूप्रमाणे आहे. ते बॅकफूटवर चेंडू खेळून काढत नाहीत, तर क्रिझमधून बाहेर पडून चौकार, षटकार मारतात. त्यांना बाद होण्याची भीती वाटत नाही, अशी मिश्कील टिप्पणी जावेद अख्तर यांनी केली.
हे न्यायव्यवस्थेचे अपयश - साकेत गोखलेन्यायव्यवस्था पूर्णतः अपयशी ठरल्यामुळे सरकारवर अंकुश राहिला नाही. त्यामुळे सरकारची हिंमत वाढून विरोधकांना तुरुंगात टाकले जात आहे. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी हे नेते केंद्रातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहेत, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी यावेळी सांगितले.