मुलुंडमध्ये डम्पिंग ग्राउंड नव्हे, गोल्फ क्लबचा मुद्दा तापणार; मनसे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:43 IST2025-12-22T10:42:32+5:302025-12-22T10:43:03+5:30
मुलुंड डम्पिंग ग्राउंडची एकूण जागा ६० एकर आहे. या जागेवर कचरा टाकणे आता बंद झाले असून, २०२६ पर्यंत प्रक्रिया करून हे डम्पिंग ग्राउंड इतिहासजमा होणार आहे.

मुलुंडमध्ये डम्पिंग ग्राउंड नव्हे, गोल्फ क्लबचा मुद्दा तापणार; मनसे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीचा त्रास सहन करत असलेल्या मुलुंडकरांना डम्पिंग ग्राउंड बंद होणार असल्यामुळे दिलासा मिळत असताना, दुसरीकडे यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. २०२६ सालापर्यंत हे डम्पिंग ग्राउंड प्रक्रिया करून बंद झाल्यानंतर तेथे गोल्फ कोर्स उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने भाजपच्या प्रस्तावानंतर घेतला आहे. या प्रस्तावाला मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मुलुंडमध्ये गाजत असलेल्या अन्य मुद्द्यांप्रमाणे गोल्फ क्लबच्या मुद्द्याचीही भर पडणार, असे दिसते.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडची एकूण जागा ६० एकर आहे. या जागेवर कचरा टाकणे आता बंद झाले असून, २०२६ पर्यंत प्रक्रिया करून हे डम्पिंग ग्राउंड इतिहासजमा होणार आहे. या जागेवर गोल्फ क्लब उभारावे, अशी मागणी मुलुंडचे भाजप आ. मिहीर कोटेचा यांनी महापालिकेकडे केली होती. त्यांचा हा प्रस्ताव पालिकेने मान्य केला आहे. कचरा विल्हेवाटीसाठी कंत्राटदाराला जून २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘रुग्णालये, महाविद्यालय किंवा क्रीडा संकुल उभारा’
गोल्फ क्लबच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. या जागेवर रुग्णालय, महाविद्यालय किंवा क्रीडा संकुल उभारावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. संजय पाटील यांनी पालिकेला दिला होता.
मात्र गोल्फ क्लबवर शिक्कामोर्तब झाल्याने राष्ट्रवादी संतप्त झाली आहे. मुलुंडमधील सर्व पालिका रुग्णालयांची अवस्था चांगली नाही. त्यांच्या खासगीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. आधी रुग्णालये सुधारा, गोल्फ क्लबची गरज काय? असा सवाल खा. पाटील यांनी केला आहे.
जागा लाटण्याचा हेतू?
मनसेनेही या वादात उडी घेतली
आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भटक्या कुत्र्यांसाठी आश्रयस्थाने, कबुतरखाने यासाठी मुलुंडची निवड पालिकेने केली आहे.
आता गोल्फ क्लबही मुलुंडकरांवर लादण्याचा भाजप आणि पालिका प्रशासनाचा डाव आहे. गोल्फ
क्लबच्या निमित्ताने ही जागा लाटण्याचा भाजपचा हेतू स्पष्ट दिसत आहे, असा आरोप मनसेचे सत्यवान दळवी यांनी केला आहे.