Join us

सर्टिफिकेट बी.कॉम.चे विषय सांगितले सायन्सचे; लंडनला जाण्याचा तरुणाचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 07:50 IST

इमिग्रेशन अधिकारी कौशिक मीना (२८) यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

- मनीषा म्हात्रेमुंबई : शिक्षणासाठी लंडनला निघालेल्या तरुणाच्या कागदपत्रांबाबत इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर त्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. बी.कॉम.ची कागदपत्रे घेऊन निघालेल्या तरुणाने चौकशीत मात्र सायन्सचे विषय सांगितल्याने त्याचा पर्दाफाश झाला. दलालामार्फत २५ लाखांत त्याने बनावट पदवी प्रमाणपत्र मिळवून लंडनला जाण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड होताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

इमिग्रेशन अधिकारी कौशिक मीना (२८) यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते कर्तव्यावर असताना बुधवारी तामिळनाडूचा  प्रणेशराज मनोहरन हा २२ वर्षीय तरुण इमिग्रेशन तपासणीसाठी त्यांच्याकडे आला.  स्कील वर्कर व्हिसावर पुढील शिक्षणासाठी लंडनला जात असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडील कागदपत्रांवर संशय असल्याने मीना यांनी तेथेच त्याची परीक्षा घेतली. मनोहरन याने बीकॉममध्ये पदवी घेतल्याचे सांगताच, अधिकाऱ्याने त्याला विषयांबद्दल विचारणा करताच त्याने फिजिक्स, बायोलॉजी असे विषय सांगितले. मात्र, हे विषय विज्ञान शाखेचे असल्याने त्यांचा संशय बळावला. 

कागदपत्रे बनावट 

इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून संबंधित युनिव्हर्सिटीला मेल पाठवून कागदपत्रांची पडताळणी केली. त्याने देखील ते बनावट असल्याचे सांगितले. त्यानुसार, मीना यांच्या तक्रारीनुसार, सहार पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवत अटक केली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

असा मिळवला व्हिसा

मनोहरनने तो बारावी पास झाल्यानंतर त्याला नोकरीसाठी लंडनला स्थलांतरित व्हायचे होते. मात्र, त्याला लंडनसाठी व्हिसा मिळत नसल्याने नातेवाईक इलानगोवन याच्याशी संपर्क साधला. त्याने, चेन्नई येथील एका एजंटच्या मदतीने त्याला २५ लाख रुपयांच्या बदल्यात अन्नामलाई युनिव्हर्सिटीचे बनावट कागदपत्रे मिळविली. त्याच कागदपत्रांच्या आधारे ब्रिटीश हाय कमिशन कार्यालयाला सादर शिक्षणासाठी लंडनला जात असल्याचे भासवून ब्रिटनचा टाईप-डी स्कील वर्कर व्हिसा मिळवल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :धोकेबाजीविद्यार्थी