कर्नाळा बँक: ‘त्या’ ठेवीदारांचे भाग्य उजळले, ६३ कोटी परत; बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 07:33 IST2022-03-25T07:32:11+5:302022-03-25T07:33:05+5:30
बँकेमार्फत कर्जवसुलीची कार्यवाही सुरू असून बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

कर्नाळा बँक: ‘त्या’ ठेवीदारांचे भाग्य उजळले, ६३ कोटी परत; बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी
मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यातील विवेकानंद पाटील आणि अभिजित पाटील या दोघांच्या मालकीच्या ७० मालमत्ता जप्तीचे आदेश काढले आहेत. बँकेमार्फत कर्जवसुलीची कार्यवाही सुरू असून बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
या बँकेच्या ठेवीदारांच्या ५ लाखांपर्यंतच्या ठेवी देण्यासाठी डीआयसीजीकडून ३७४.०५ कोटी रुपयांची रक्कम बँकेस प्राप्त झाली असून या रकमेचे ठेवीदारांना वाटप सुरू करण्यात आले आहे. १० मार्चपर्यंत ३ हजार ६५ ठेवीदारांना ६३.५२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, उर्वरित वाटपाचे काम बँकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
भाजपाचे प्रशांत ठाकूर व अन्य सदस्यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत कर्नाळा बँकेत आर्थिक अनियमितता आढळून आली. त्यानंतर बँकेवर आर्थिक निर्बंध आणले. बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांची नियुक्ती केली. त्यांनी एकूण २० व्यक्तींविरुद्ध ५२९.३६ कोटी रुपये रकमेचे दोषारोपपत्र बजावले.