ज्येष्ठांसाठी डब्बा असलेली पहिली लोकल धावली; इतरांनी प्रवास केल्यास किती दंड भरावा लागेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:17 IST2025-07-11T08:17:35+5:302025-07-11T08:17:54+5:30
१३ आसन क्षमता असलेल्या या डब्यात ५० पेक्षा अधिक प्रवासी उभे राहू शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्येष्ठांसाठी डब्बा असलेली पहिली लोकल धावली; इतरांनी प्रवास केल्यास किती दंड भरावा लागेल?
मुंबई : सीएसएमटीवरून डोंबिवलीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी डब्बा असलेली पहिली लोकल गुरुवारी धावली. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेने लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरक्षित डबा तयार केला आहे. या डब्यातून ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतर प्रवाशांनी प्रवास केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हा दंड १०० ते १५० रुपयांपर्यंत असू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वे त्यांच्या ताफ्यातील सर्व नॉन एसी १५७ लोकलमध्ये येत्या १८ महिन्यांच्या कालावधीत बदल करून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा तयार करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ५७ लाख ३० हजारांचा खर्च करण्यात येणार असून प्रत्येक डब्यासाठी ४.५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. माटुंगा वर्कशॉपमध्ये लगेज डब्यात सुधारणा करून त्यात तीन ३ सीटर बेंच आणि दोन २ सीटर युनिट्स बसविण्यात येत आहेत. १३ आसन क्षमता असलेल्या या डब्यात ५० पेक्षा अधिक प्रवासी उभे राहू शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
असा आहे डब्बा
सीएसएमटीच्या टोकापासून सहाव्या क्रमांकावर हा डब्बा असेल. या डब्याच्या आतील बाजूस निसर्गचित्रे, गेटवे ऑफ इंडिया आणि सीएसएमटी वास्तूच्या चित्रांचे व्हिनाइल रॅपिंग करण्यात आले आहे. दोन्ही दरवाजांच्या अंडरफ्रेमवर आपत्कालीन शिडी आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार नवीन कंपार्टमेंट तयार केला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही या कोचमध्ये प्रवास केला तर कारवाई केली जाईल. - डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रेल्वेचा हा उपक्रम खूप चांगला आहे. यामुळे आमच्यासारख्या वृद्धांना खूप सुविधा मिळतील. आशा आहे की हा बदल सर्व लोकल ट्रेनमध्ये लवकरात लवकर होईल. - राजपथ उपाध्याय, ज्येष्ठ प्रवासी