Join us

नालेसफाईच्या रखडपट्टीमुळेच 'बुडबुड नगरी'चा अनुभव; छोटे नाले, मिठी नदी मोकळा श्वास कधी घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:02 IST

८९ टक्क्यांहून अधिक गाळ काढल्याचा पालिकेचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात छोट्या नाल्यांची आणि मिठी नदीची सफाई जवळपास ८० टक्केच पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातही मिठी नदीची सफाई १० टक्के, तर छोट्या नाल्यांची सफाई २५ टक्केच होऊ शकली आहे. अनेक भागांत छोट्या नाल्यांतील गाळामुळे पाण्याचा निचरा व्हायला अडथळे आले. परिणामी पाण्याचा प्रवाह पुन्हा रस्त्यांवर आल्याची माहिती नागरिकांनी दिली. मिठी नदीच्या काठावरील रहिवाशांनी या अर्धवट नालेसफाईवर बोट ठेवत प्रशासनावर टीका केली आहे.

पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी पालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. यंदा पावसाळ्यापूर्वी नऊ लाख ६९ हजार ६६१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार उद्दिष्टाच्या ८९ टक्क्यांहून अधिक गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, विरोधकांकडून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली असल्याचे पालिकेने घोषित केले आहे. मात्र, मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नालेसफाईच्या कामांचे पितळ उघडे पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुसऱ्या टप्प्यातील नालेसफाई (मेट्रिक टन)प्रकार    एकूण    काम पूर्ण    टक्क्यांमध्ये

  • शहर    ३,७९०.६२    ५८५.१८    १५ 
  • पूर्व उपनगरे    १५,३२०.०४    १,२०९.५५    ७
  • प. उपनगरे    २५,७०८    ५५५.८८    २
  • छोटे नाले    ९८,३४०.४४    २५,०२३.१०    २५.४५ 
  • मिठी नदी    ५३,५७८.८७    ५,५२५.६५    १०.३
  • एकूण    १,९६,७३८.८२    ३२,८९९.३६    १६

 

  • ३०९  मोठे नाले, १५०८ लहान नाले
  • किती कंत्राटदारांना कामे     २३
  • मुंबईतील नाले आणि मिठी नदी एकूण लांबी    ६८९ किमी
  • रस्त्यांलगतच्या गटारांची एकूण लांबी    २,००० किमी

नालेसफाईचा दोन वर्षांतील खर्च

  • शहर भाग    ३९.४५ कोटी
  • पूर्व उपनगरे    १४८.३९ कोटी
  • पश्चिम उपनगरे    २५७.३५ कोटी
  • मिठी नदी    ९६ कोटी

१५ कोटींचा दंड

यंदा नालेसफाईच्या कामात पालिकेने ‘एआय’चा वापर केला असून, गाळ काढण्याची चुकीची माहिती देणाऱ्या कंत्राटदारांना जवळपास १५ कोटींचा दंड करण्यात आला आहे. नालेसफाईची तक्रार सोशल मीडिया अकाउंट्सवर किंवा १९१६ या पालिकेच्या हेल्पलाइनवर करता येते. यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. 

टॅग्स :पाऊसमुंबई